केंद्रीय मंत्रीपदाच्या कालावधीत नारायण राणे एकही विकासकाम मालवणात करू शकले नाहीत हे त्यांचे अपयश ; शिवसेना ( उ. बा. ठा. ) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका.
मालवण : केंद्रीयमंत्री पदाच्या कालावधीत नारायण राणे एकही विकासकाम मालवणात करू शकले नाही, हे त्यांचे अपयश आहे अशी टीका शिवसेना ( उ. बा. ठा. ) मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की सकाळी उठावे आणि मातोश्रीवर टीका करावी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी हाच राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचा विकासाचा कार्यक्रम आहे. राणे यांच्याकडून जनतेला विकासाची अपेक्षा होती, मात्र जनतेला उपेक्षित ठेवण्याचे काम राणे यांनी केले. त्यामुळे राणे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असून मतदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचे काम राणे यांच्याकडून सुरु आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी करत जनता सुज्ञ असून ती शिवसेना – इंडिया आघाडीचे उमेदवार खास. विनायक राऊत यांच्याच पाठीशी उभी राहील, व राऊत हेच विजयी होतील, असा विश्वास मालवण शहर शिवसेना पक्ष कार्यालयातील एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, आकांक्षा शिरपुटे, नीनाक्षी मेतर, उमेश मांजरेकर, गणेश कुडाळकर, दीपक देसाई, अक्षय भोसले, नरेश हुले, मोहन मराळ, नीलेश कुडाळकर, महेश देसाई, जेम्स फर्नांडिस, संदीप कोयंडे, करणखडपे, सन्मेश परब, बंड्या लुडबे, नितीन वाळके, अक्षय रेवंडकर, हेमंत मोंडकर, चंदू खोबरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, राणे कुटुंबियांना ठाकरे कुटुंबियांवर टीका करण्यासाठीच भाजपमध्ये घेतलेले आहे. ठाकरेंवर टीका केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही. त्यांनी मतदारसंघात एकही विकासकाम आणलेले नाही. त्यामुळे विकासकामांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दाच नसल्याने ठाकरेंवर ते टीका करत आहेत. ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेमुळे निष्ठावंत शिवसैनिक आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण तालुक्यात जोरदार प्रचार सुरू केला असून मागील निवडणुकीपेक्षा किमान पाच हजारांचे वाढीव मताधिक्य विनायक राऊत यांना देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत, असेही खोबरेकर यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)