लाखोंच्या क्रिकेट स्पर्धा आणि क्लीन बोल्ड झालेला गावांचा विकास लक्षात घेता आता गावातील नागरीकांनी आपले फुटवर्क सांभाळावे : सामाजिक समन्वयक रोशन चिंचवलकर.
विकासाची इच्छाशक्ती नसलेली नेतृत्व आणि त्यांची फक्त ‘हवा’ करण्याची मानसिकता यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास नाही अशी रोशन चिंचवलकर यांची खंत.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे सुपुत्र व मुंबई येथील सामाजिक समन्वयक रोशन चिंचवलकर यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावचा विकास याविषयी भाष्य केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा समुद्र किनारपट्टी, डोंगर, नदी, ओहोळ यांनी समृद्ध जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या काळानंतर रोजगार या एकमेव गोष्टीसाठी गावागावातून वाडी वाडीतून जिल्ह्यातील माणसे आधी मुंबई आणि आता पुण्या सारख्या ठिकाणी गेली. दहावी, बारावी झाल्यावर होणारे स्थलांतर अजूनही चालू आहे. फक्त या स्थलांतराचे कारण याआधी फक्त रोजगार होते. आता या रोजगाराला १ आरके रूम आणि त्यामागून येणारे लग्न यांची जोड मिळालीय असेही रोशन चिंचवलकर यांनी म्हणले आहे.
रोशन चिंचवलकर यांच्या म्हणण्यानुसार, भुरळ पडणाऱ्या समृद्ध असलेल्या या जिल्ह्याला शासनाकडून गावागावातील विकासासाठी, रोजगारासाठी, महिला सबलीकरणासाठी काहीच प्रयत्न होतं नसतील का? कदाचित् आजपर्यंतच्या सर्वच पक्षांची सरकारे निश्चितच निरनिराळ्या योजना, मार्गदर्शन कार्यक्रम यांच्या माध्यमातून गावागावात रोजगार साधण्यासाठी प्रयत्न करत असतीलही परंतु इतक्या वर्षातही, रोजगार, व्यवसाय यांसारख्या क्षेत्रात गावागावात म्हणावी तशी प्रगती का झाली नाही याची अनेक कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे विकासाची समज, इच्छाशक्ती नसलेली नेतृत्व आणि त्यांची फक्त ‘हवा’ करण्याची मानसिकता असल्याची खंत त्यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.
विविध योजना लोक सहभागातून राबवण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितच गावातील युवक, महिला यांना उत्तम जीवन जगण्याची संधी मिळेल. शिवाय, ज्येष्ठ नागरिक देखील आयुष्याचा उर्वरित काळ उत्तम रित्या जगू शकतील, पण तसं होताना दिसत नाही हे वास्तव आहे. कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात अर्थ नाही. पण ज्या नेतृत्वाकडे हक्क, अधिकार असतात, ती नेतृत्व आपली कारकीर्द हवा करण्यात घालवत असतील तर ते मतदारांचे दुर्दैव आहे असे रोशन चिंचवलकर म्हणतात.
रोशन चिंचवलकर यांनी गावागावात आयोजीत होणार्या क्रिकेट टूर्नामेंटस वर भाष्य करताना म्हणले आहे की गावागावात वरचेवर आणि हजारो, लाखो रुपयांच्या ज्या क्रिकेट स्पर्धा राबविण्यात येत असतात त्यांचा. क्रिकेट हा उत्तम खेळ आहे. तो खेळला पाहिजेच. शारीरिक तंदुरुस्ती देखील त्याने साध्य होते. पण संपूर्ण गावात क्रीडा या क्षेत्राला धरून पायाभूत सुविधा उपलब्ध केलेल्या नसताना, किंवा गावात क्रिकेट आणि इतर खेळाना व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देण्यात इथली नेतृत्व यशस्वी नसताना केवळ काही मोसमात काही हजार लाखोंच्या स्पर्धा ठेऊन (भरवून ) गावाचा सक्षम क्रीडा विकास काय साध्य होत आहे का ? यातही या स्पर्धा व्यावसायिक स्वरुपात राबवल्या गेल्या आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून गावात काही ‘शाश्वत काम’ साध्य झालं तर चांगली गोष्ट आहे, पण तसंही होताना दिसत नाही याचेही दुःख आहे. जिल्ह्यात गावपातळीवर आर्थिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, विकास साधायची एक पद्धत असणे गरजेचे आहे. दूरदृष्टी असलेल्या नव्या नेतृत्वाने आणि गावातील तमाम नागरिकांनी ती समजून घेणे आवश्यक आहे.
राजकीय रणसंग्रामाच्या मैदानावर वाहणाऱ्या जोरदार राजकीय हवेमुळे येणाऱ्या काळाचा चेंडू नीट न समजल्यामुळे दिवसेंदिवस गावांचा विकास असाच क्लीन बोल्ड होत राहणार आहे. आगामी काळात गावातील सामान्य नागरिकांनी आपले फूट वर्क नीट सांभाळावे असाही सल्ला सामाजिक समन्वयक रोशन चिंचवलकर यांनी दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)