गणेश विसर्जना दरम्यान काही ठिकाणी अपघात घडून गणेशभक्तांचा अंत ; जखमींचाही नेमका आकडा वाढण्याची शक्यता.
मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यात श्री गणेशोत्सव २०२३ उत्तम रित्या शांततेत संपन्न होत असताना राज्यातील अनेक भागातून गंभीर आणि किरकोळ स्वरुपाच्या दुर्घटना व अपघात झाल्याची माहिती समोर येत आहेत. यात सर्वाधिक दुर्घटना या कोकणात झाल्याचे समोर आले आहे. ज्यात एकूण ४ गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला व हाहाःकार उडाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर इथे ही दुर्घटना घडली. गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. तेव्हा नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी अचानक एक ब्रेक निकामी झालेला टेम्पो गर्दीत घुसला. हा टेम्पो वेगाने गर्दीत घुसल्याने अनेकजण चिरडले गेले. त्यात १५ हून अधिक लोक जखमी झालेत. तर दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाहे. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला, मात्र पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. इथल्या जखमींचा नेमका आकडा वाढण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात देखील गणपती विसर्जनाला गालबोट लागले आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदी काठावर ही दुर्घटना घडली. ज्यात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार गणेशभक्त नदीत वाहून गेले. त्यापैकी एक जण बचावला. एकाचा मृतदेह हाती लागला असून दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. कर्जत तालुक्याकील उक्रुळ इथे ही दुर्घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबईत गणेश विसर्जनावेळी एक दुर्घटना घडली. मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ह्या तरुणाचा कूपर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तरुणावर वीज कोसळल्यानंतर त्याला लगेचच रुग्णवाहिकेतून विले पार्ले येथील कूपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. नाशिकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान ४ जण बुडाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यापैकी गोदावरी नदीत दोघांचा तर वालदेवी धरणाच्या पाण्यात दोन जण बुडाले असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व गणेश भक्तांनी व मंडळांनी योग्य ती आरोग्य विषयक काळजी घ्यावी असे आवाहन संरक्षण यंत्रणांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)