शिक्षक नावाचा महासागर..! (शिक्षक दिन विशेष )
सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात १९८० व ९० चे दशक म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तेचा सुवर्ण काळ होता. प्रत्येक हायस्कूलचे मुख्याध्यापक हे एक वेगळीच शैक्षणिक व सामाजिक मशाल म्हणून ओळखले जात होते. भंडारी एज्युकेशन सोसायटीचे श्री राजुरकर सर, रेकोबा हायस्कूलचे श्री गांवकर सर, स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे कर्णिक सर…एक ना अनेक स्फूर्तीदायक नावांनी मालवणचे शैक्षणिक वैभव नटले होते. अ शि दे टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री प्रकाश प्रभू एक असेच मोठे नांव होते व आजही आहे की जे महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांच्या यादीत सर्वोच्च आहेच परंतु “शाळा कशी चालवावी” यातील प्रशासकीय भूमीकेतील कदाचित् महाराष्ट्र राज्यातील सर्वात वरचे नाव आहे.
प्रकाश प्रभू सर हे मराठी, संस्कृत व इंग्लिश अशा भाषांचे तज्ञ. टोपीवाला हायस्कूलची ‘क्रीम बॅच’ म्हणजे इयत्ता १० वी ‘अ’ तुकडी. श्री प्रकाश प्रभू सरांचे वैशिष्ट्य असे की मुख्याध्यापक व संस्थेच्या असंख्य जबाबदारी पार पाडताना ते या क्रीम बॅचचे वर्गशिक्षक तथा क्लास टीचरला म्हणून सलग १६ वर्षे कार्यरत होते. प्रभू सरांचे घर अगदी शाळेला लागूनच होते..सोबतचे शिपाई कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक वगैरेंनी चारचाकी घेतल्या तरी प्रभू सरांचे साधे पण हे शाळेमागील गडग्यावरुन शाळेत दाखल होणे इतके महान होते.
१९९१ सालचा विश्वचषक सुरु होता. भारतीय संघ आधीच बाहेर पडला होता. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना प्रभू सरनी शाळेच्या ग्रंथालयात बघायची परवानगी दिली होती. तत्कालीन सहशिक्षक श्री संजय जोशी, श्री. खानोलकर, श्री. श्रीनिवास पंडित, श्री. एल. डी. सावंत, श्री. तोरगळकर व शाळेतील मुलं यांच्यासोबत प्रभू सरांनी तो सामना जुन्या आठवणींसकट अनुभवला आणि त्यावेळच्या युवा इंझमाम उल हक नावाच्या १८ वर्षीय मुलाची स्तुती करत शब्द वापरले,” हे खरं टॅलेंट..हा मुलगा खूप नांव कमवणार..!” इंझमामने पुढे किती उत्तम नांव कमावले हे अख्खं जग जाणते…परंतु प्रभू सरांनी ते पटकन ओळखले होते हे विशेष.
श्री प्रकाश प्रभू सर हे शिक्षक, प्राध्यापक किंवा शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा होतेच परंतु ते एक प्रतिथयश लेखक होते. त्यांची लिहिलेली “सागरकैद” कादंबरी टायटॅनिकच्या फॅन्सनाही भुरळ पाडेल अशीच आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींचे शैक्षणिक क्षेत्रातील भविष्य हे वाचनावर अवलंबून आहे असा विश्वास असलेला ठाम मुख्याध्यापक होते ते. पालकांची एकही नाटकी मिटींग न घेता प्रत्येक पालकांशी घट्ट नाते जपून ठेवलेले ते एक प्रत्येकाचे कुटुंब प्रमुख होते. “तत्कालीन एकाही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींचे पैशा अभावी शिक्षण अडले नव्हते”..ही प्रभूसरांची थोर पुण्याई आहे..!
आपली सिंधुनगरी चॅनल समूहातर्फे खरेखुरे मुख्याध्यापक श्री प्रकाश प्रभू सर यांना आदरांजली व त्यांच्या सजीव स्मृतीला मानवंदना.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)