नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.
नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.
जलस्रोतांचे संवर्धन, पुनर्भरण आणि बळकटीकरणाचा उद्देश.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पुनर्भरण आणि बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी १० ऑक्टोबर रोजी आदेश क्रमांक ५ निर्गमित केला आहे.
या आदेशानुसार, संबंधित क्षेत्रातील खाजगी विहिरींचे प्रभागनिहाय व ठिकाणनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये विहीरमालकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, विहिरीची खोली व व्यास, सद्यस्थितीतील पाणीपातळी, पाण्याचा वापर करणाऱ्या व्यक्तींची संख्या, पाणी किती दिवस पुरते, पाण्याचा उपसा करण्याची व्यवस्था आदी माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच पाणी उपलब्ध असलेल्या, कमी पाणी असलेल्या आणि कोरड्या पडलेल्या विहिरींची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वेक्षणातून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे जलपुनर्भरणासाठी योग्य विहिरींची निवड करून तांत्रिक तपासणी करावी. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यासाठी जलतरण व वनराई बंधारे उभारणे, पावसाचे पाणी अडविणे व जिरविणे, छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन, रेनवॉटर हार्वेस्टिंग तसेच इतर उपयुक्त जलसंवर्धनाच्या उपाययोजना प्रस्तावित कराव्यात. विहिरींची स्वच्छता, गाळ काढणे व दुरुस्तीची कामेही आवश्यकतेनुसार तांत्रिक निकषांनुसार करावीत. या कामांसाठी शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
सर्व संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी विहिरींच्या सर्वेक्षणाचा एकत्रित अहवाल आणि जलस्रोत बळकटीकरणाचा कृती आराखडा तयार करून १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आदेशात नमूद आहे. सर्वेक्षण व उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मुख्याधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, तसेच तांत्रिक निकष, निधीविषयक तरतुदी आणि विहीरमालकांचे सहकार्य याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्पष्ट केले आहे.
( छायाचित्र : संग्रहित)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, की...
मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
मालवणात भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू.नगरा...
हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे
आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा.