जाहिरात
'गाथेचे पुस्तकांनी वंदन...!'
'गाथेचे पुस्तकांनी वंदन...!'
मालवणात 'सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६' च्या निमित्ताने संत तुकारामांच्या अभंग परंपरेला वंदनासह बॅरिस्टर नाथ पै सेवांगण तर्फे वाचन संस्कृतीचा जागर.
मालवण | प्रतिनिधी : संतवाङ्मयाची समृद्ध परंपरा, लोकभाषेतील अभिव्यक्तीचे सामर्थ्य आणि वाचनसंस्कृतीचा जागर अशा प्रेरक प्रयत्नांतून 'सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६' च्या निमित्ताने मालवण येथील संत तुकाराम महाराज पादुका मंदिरात पादुका पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न झाला. ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. संतपरंपरेला वंदन करतानाच पुस्तकांच्या माध्यमातून वाचनसंस्कृती समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांच्यासह दशरथ कवटकर व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैशाली पंडित यांनी मालवणमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यामागील भूमिका विशद केली. वैशाली पंडित यांनी संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे संत आंणि सोबतच समस्त कवी, लेखक आणि साहित्यिकांचे प्रेरणास्थान व गुरू आहेत अशा शब्दात संत तुकारामांना वंदन केले. संत तुकारामांनी त्यांचे अभंग सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिले आणि ते घराघरांत पोहोचविले. अवघड तत्त्वज्ञान साध्या, सहज आणि ओघवत्या लोकभाषेतून मांडण्याची त्यांची ताकद विलक्षण होती. त्यामुळे त्यांचे अभंग हे केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न राहता लोकांच्या जगण्याचा, विचारांचा आणि भावविश्वाचा भाग बनले असेही वैशाली पंडित यांनी स्पष्ट केले. संत तुकाराम महाराजांच्या 'आवा चालली पंढरपुरा' या अभंगाचा अन्वयार्थ स्पष्ट करताना त्यांनी अभंगांमधील भावविश्व आणि लोकजीवनाशी असलेले त्यांचे नाते उलगडले. इंद्रायणी नदीत बुडविलेले अभंग पुन्हा वर आले, या आख्यायिकेचा संदर्भ देताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण विचार मांडला. हे अभंग लोकगंगेत आधीच रुजलेले होते. लोकांच्या मुखात, स्मरणात आणि हृदयात ते जिवंत होते. त्यामुळे ते पुन्हा लिहिले गेले. संत तुकाराम महाराजांचे साहित्य लोकांना किती आपलेसे वाटत होते, याचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य हे लोकांच्या जगण्याशी जोडले गेले, तरच ते चिरंतन होते, हा विचारही या निमित्ताने अधोरेखित झाला.
या कार्यक्रमात, मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी पुस्तकांचे संच भेट देण्यात आला. बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते सेवांगणच्या वतीने वाचनासाठी पुस्तकांचे संच मंदिरात प्रदान करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या वतीने श्री. दशरथ कवटकर यांनी हे पुस्तक स्विकारले. ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनीही आपली पुस्तके स्थानिक नागरिकांना वाचनासाठी भेट दिली. सौ. कवटकर यांनी ती स्वीकारली. अशा प्रकारे संतांच्या पवित्र स्थानावर अभिवादनासोबतच ज्ञानदान आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी श्री. दशरथ कवटकर यांनी संत तुकाराम महाराज पादुका मंदिराची माहिती दिली. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी त्यांच्या मनोगतात वैशाली पंडित यांनी मांडलेल्या या संकल्पनेची विशेष प्रशंसा केली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा आशीर्वाद घेणे आणि त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे, हा उपक्रम साहित्यिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. संत तुकाराम महाराजांचे साहित्यिक म्हणून असलेले महत्त्व विशद करत त्यांनी संतसाहित्याने मराठी भाषेला आणि साहित्यविश्वाला दिलेल्या समृद्ध योगदानाचा उल्लेख केला. दरम्यान, ॲड देवदत्त परुळेकर यांनी उपस्थितांना २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
संतवाङ्मयाला वंदन आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार या दोन्ही उद्देशांच संगम या उपक्रमातून साधण्यात आला असून, हे युवा साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिकांचे संमेलन नसून समाजात विचारांची देवाणघेवाण घडविणारे आणि नव्या पिढीला साहित्याशी जोडणारे सांस्कृतिक व्यासपीठ आहे असेही आयोजकांच्या वतीने आवर्जून सांगण्यात आले. संत तुकाराम महाराजांनी लोकभाषेतून जनमानसाशी साधलेला संवाद आणि आजच्या युवा साहित्यिकांच्या लेखनातून समाजाशी साधावयाचा संवाद यांचा सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे 'सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन – २०२६' हे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे संपन्न होणार आहे. 'माझा काळ, माझी भूमिका' ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
तरुणाईला साहित्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे, नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील साहित्यिक परंपरेचा परिचय नव्या पिढीला करून देणे आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक जाणीवा समृद्ध करणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. ग्रंथदिंडी, स्थानिक कवी संमेलन, निमंत्रित कवी संमेलन, साहित्यिकांच्या मुलाखती, विविध साहित्यिक स्पर्धा आणि वैचारिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी हे संमेलन रंगणार आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना वंदन करून वाचनसंस्कृतीचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
या कार्यक्रमाला मंगल परुळेकर, दशरथ कवटकर, अशोक ओटवणेकर, अभय कवटकर, प्रणाली कवटकर,श्वेता कवटकर, अनिता चव्हाण, ऋतुजा केळकर, गौरी केळुस्कर यांच्यासह देऊळवाडा परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले, तर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्यध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर यांनी आभारप्रदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)