आमदार निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या भावनांना सभागृहात वाचा फोडली.
आमदार निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या भावनांना सभागृहात वाचा फोडली.
जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांची आक्रमकता आणि मंत्रीमंडळासह सरकारचे भगिरथ प्रयत्न व सकारात्मकतेविषयी कृतज्ञता.
मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांनी, यंदा मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक कलाकारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न अत्यंत अभ्यासूपूर्वक मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे असे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण येथील पत्रकार परिषदेत सांगितले. आमदार निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या भावनांना सभागृहात वाचा फोडली असून, महायुती सरकारनेही या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महायुतीच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेविका शर्वरी पाटकर, शहर संघटक राजू बिडये, देवेंद्र नाईक, राजा सामंत, भाऊ मोरजे, भाई मांजरेकर, सूर्यकांत पालव यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी, आमदार निलेश राणे यांच्याकडून पावसाळी अधिवेशनात उपस्थित केल्या गालेल्या ७ ते ८ प्रमुख मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली आणि महायुती सरकारविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आमदार निलेश राणे यांनी हा प्रश्न सभागृहात लावून धरल्यानंतर, कृषिमंत्र्यांनी अवघ्या १२ तासांत निर्णय घेत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साडेबावीस हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली. याशिवाय इन्शुरन्सचे पैसे वेगळे मिळणार असून, पुरवणी यादीमध्ये शेतकऱ्यांसाठी आणखी एक विशेष पॅकेज जाहीर करण्याचे कृषिमंत्र्यांनी मान्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट मदत मिळवून देण्यात आमदारांना यश आले आहे. पारंपरिक व व्यावसायिक मच्छीमारांच्या डिझेल कोट्याचा प्रश्न आमदारांनी सभागृहात मांडला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात असणारा कमी डिझेल कोटा, डिझेलचे वाढीव दर आणि परतावा यातील तफावत त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे दोन्ही बंधू मच्छीमारांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनीही यावर सकारात्मक पावले उचलली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात जुने वीज मीटर काढून 'स्मार्ट मीटर' बसवण्याचा जो उपक्रम राबवला जात होता, तो सर्वसामान्यांसाठी कसा जाचक आहे, हे आमदार राणे यांनी सभागृहात स्पष्ट केले. जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्यामुळे या स्मार्ट मीटरच्या सक्तीला सध्या स्थगिती मिळाली आहे.
जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदे, डॉक्टरांची कमतरता आणि औषध तुटवडा याकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नव्याने सुरू होणारे मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय या दोन्ही व्यवस्थांचा ताळमेळ बसवून सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
मतदारसंघातील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच चौके, कट्टा आणि सुकळवाड येथील प्रवासी शेडच्या कामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला आहे.
सिंधुदुर्गाची अस्मिता असलेल्या दशावतार, भजन आणि कीर्तन कलाकारांना न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणे हे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. काल त्यांनी विधिमंडळात हा विषय लावून धरल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कलाकारांसाठी वार्षिक साडेचार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच कलाकारांना ओळखपत्र देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्थानिक पातळीवर शिबिरे घेऊन नोंदणी प्रक्रिया सोपी करण्याचे मान्य केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ८६ पारंपरिक दशावतार कंपन्या असून अडीच ते तीन हजार कलाकार आहेत. तसेच भजनी कलाकारांची संख्या १५ ते २० हजारांच्या घरात आहे. शासनाचा सध्याचा प्रतिवर्षी १०० लोकांचा मानधनाचा कोटा अत्यंत तोकडा आहे. हा कोटा किमान तीन पटीने वाढवावा, यासाठी आम्ही माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्र्यांकडे प्रयत्न करणार आहोत. तसेच ५० पेक्षा जास्त प्रयोग करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना 'अ' दर्जा देऊन मानधनात प्राधान्य मिळावे, अशी आमची मागणी आहे असे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.
सामंत म्हणाले की, आम्ही जरी शिवसेनेचे काम करत असलो, तरी जेव्हा सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि मच्छीमार निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक करतात, तेव्हा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आम्ही योग्य लोकप्रतिनिधी निवडल्याची भावना मतदारांमध्ये आहे. सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे सर्वजण भगीरथ प्रयत्न करत आहेत. या सर्वच मंत्रिमंडळाचे आम्ही जाहीर आभार मानतो आणि आमदार निलेश राणे यांना पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना करतो असेही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी, महाराष्ट्र राज्य लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य देवेंद्र नाईक यांनी आमदार निलेश राणे यांनी दशावतार कलेला राजाश्रय मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम केले असे सांगत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार निलेश राणे आणि कोरोना काळासह अनेक संकटसमयी सदैव लोककलावंतांसाठी अन्नधान्यासह भक्कम आधार बनलेल्या जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)