मणचे येथे श्री पद्धतीने भात लावणीच्या प्रात्यक्षिका अंतर्गत कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
मणचे येथे श्री पद्धतीने भात लावणीच्या प्रात्यक्षिका अंतर्गत कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मणचे येथे आत्मा अंतर्गत नैसर्गिक शेती आधारित भात पिक शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन शेती क्षेत्रावर करण्यात आले. याकरिता उप विभागीय कृषीअधिकारी कणकवली उमाकांत पाटील, मंडळ कृषी अधिकारी वाडा एस. एम. जाधव, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निकेतन राणे, सहाय्यक कृषि अधिकारी मणचे स्वप्निल तेली, होस्ट फार्मर राजेंद्र काडगे व इतर सर्व शेतकरी उपस्थित होते. या वर्गात एस. एम. जाधव यांनी भात लागवडीच्या विविध पद्धतींविषयी माहिती दिली व 'श्री पद्धती' विषयी सविस्तर मार्गदर्शन करून 'श्री पद्धती'ने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी 'श्री पद्धती' ने भाताची पुनर्लागवड, कृषिविभागाच्या योजना, यावर्षी उद्भवणारे अल निनोचे संकट इ. बाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. सध्या भेडसावणाऱ्या भाताची रोप वाटिका पिवळी पडणे या समस्येवर पाहणी करून उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
शेतकरी श्री. राजेंद्र काडगे यांनी गावातील होतकरू शेतकरी प्रकाश रहाटे, सुनिल धाक्रस , अल्केश गुरव, भिमराज रहाटे, वैशाली लाड, सुरेश घाडी, साहिल घाडी, गजानन ढवळे, मुकेश काडगे, सचिन घाडी, विजय देवळेकर यांना एकत्र करून भवानी शेतकरी गट नावाने शेतकरी गटाची स्थापना केली आहे. या गटाने या वर्षी पाणी फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून सर्वांनी एकत्र येऊन गटशेती करण्याचा निर्धार केला आहे. भवानी गटाच्या माध्यमातून एकत्र खते, बि - बियाणे खरेदी, पाणी फाऊंडेशनच्या डिजिटल शेतीशाळांमध्ये सहभाग घेणे, जीवामृत, दशपर्णी अर्क, गोकृपामृत यासारख्या सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती करून वापर करणे यासारखे उपक्रम राबवित आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)