मालवणातील श्री देव नारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ.
मालवणातील श्री देव नारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात, अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचा, २४ मे २०२६ रोजी उत्साहात शुभारंभ झाला.
या सोहळ्या अंतर्गत आज सकाळच्या सत्रापासून श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन (संहिता वाचन), श्री विष्णू देवतेस सहस्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्र नामावलीसहीत देवीला कुंकूमार्चन तसंच आयोजकांकडून ५ वर्षे ते ९ वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न झाले. हे सर्व विधी 'संपूर्णपणे निःशुल्क' होते.
या धार्मिक विधींचे पौरोहित्य श्री. किशोर जोशी, श्री. गणेश उर्फ राजू जोशी, श्री. कार्तिकेय जोशी, श्री. योगेश जोशी, श्री. योगेश लेले, श्री. गिरीश मुंडले यांनी केले. यावेळी मालवणच्या श्री देव नारायण मंदिरचे ज्येष्ठ पुरोहीत श्री. सुमेध जोशी त्यांची पत्नी सौ. मनिषा जोशी या दांपत्याने यजमानपद भूषवले. श्रीमद् भागवत सप्ताह सोहळयाचा संकल्प आणि विविध धार्मिक विधींसह आरतीने पहिल्या दिवसाच्या प्रथम सत्राची सांगता झाली.
*द्वितीय सत्र.*
आयोजक भगवत भक्त व उपस्थित सहकारी महिलांनी श्री गणेशाचे वंदन करत श्री गणपती स्तोत्राचे पठण केले. यानंतर 'हिच अमुची प्रार्थना' ही प्रार्थना सादर करत द्वितीय सत्राचा आरंभ करण्यात आला. यानंतर भगवत भक्त व श्रोते यांच्यासाठी सुप्रसिद्ध निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांच्या बहुप्रतिक्षित व विशेष उत्कंठेच्या असलेल्य् श्रीमद् भागवत महापुराणातील कृष्णलीलांचे मराठीतून निरूपण या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. निरूपणकार प्रणव गोखले यांचे विधिवत स्वागत व त्यांच्या अध्यात्मिक भूमिकेचा परिचय पुरोहित श्री. राजू जोशी यांनी करून दिला.
निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांनी श्रीमद् भागवताची ओळख, गरज व महती याद्वारे विविध युगातील स्थित्यंतरांची माहिती दिली. अधिक मास आणि त्याच्या व्युत्पत्तीबद्दल त्यांनी विविध पौराणिक प्रसंग, कथा आणि प्रसंगानारूप उदाहरणे देऊन विवेचन केले. बदलत्या काळात भारतीय संस्कृतीतील मर्म जाणायचे माध्यम व निकड म्हणून श्रीमद् भागवताचे महत्व विशद करताना त्यांनी तर्क, तत्व आणि सत्वाची नीती व गती समजावून सांगितली. श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, श्रोत्यांच्या विविध प्रकारांचे वर्गीकरण करताना उपस्थित श्रवणकर्त्यांपैकी प्रत्येकजण स्वतः कुठल्या प्रकारात आहे हे पाहू शकतो हेही जाणायची अध्यात्मिक युक्ती त्यांनी उलगडली.
श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक भगवत भक्त व सहकारी संचाच्या वतीने करण्यात आले असून या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी पुरोहित श्री. सचिन वझे (9422435395), सौ. प्रीती वैद्य, (9405930122), श्री. गजानन अभ्यंकर ( 9420728752) व सौ. शुभदा अभ्यंकर ( 9423053014) यांच्याशी संपर्क साधता येऊ शकतो.
मालवण ग्रामदैवत श्री. देव नारायण मंदिर येथील या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी देवस्थान संबंधित विश्वस्त, मालवण व परिसरातील पुरोहित , ब्रम्हवृंद, मान्यवर, गांवकर मंडळी, देऊळवाडा व मालवणवासिय यांचे सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थिती लाभली.
ह्या सोहळ्याच्या आरंभापूर्वी मालवण व परिसरात वरूण राजाचे आगमन झाले त्यामुळे सर्वांगीण मालीन्य दूर होऊन देवकृपेचा अनोखा वर्षावात मालवण व परिसर न्हाऊन निघाला अशी भावना व्यक्त होत आहे तसेच श्री. देव नारायण मंदिर प्रांगणातल्या श्री. पावणादेवी मंदिर समोरील आकर्षक मंडपातल्या मंचावरून निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांचे जवळपास चार तास चाललेले निरूपण हे, 'मालवणातील श्रीमद् भागवत भक्तिच्या नूतन उर्जेचा स्रोत ठरत असल्याची प्रतिक्रिया देखिल भगवत भक्त, भाविकांच्या वतीने व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)