कृष्णनगरीत कृष्ण मूर्तीचे थाटात आगमन.
कृष्णनगरीत कृष्ण मूर्तीचे थाटात आगमन.
मालवण शहरातील श्री देव नारायण मंदिर येथील श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याची पूर्वसंध्या कृष्णचैतन्याने सजली.
मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २४ मे २०२६ ते रविवार, ३१ मे २०२६ या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, पुरोहित, भगवत भक्त तसेच गावकर, मानकरी, सेवेकरी आणि बाळगोपाळांच्या उपस्थितीत, श्री देव नारायण मंदिर प्रांगणात सजलेल्या 'कृष्ण नगरीत' एका भक्तीपूर्ण मिरवणुकीद्वारे कृष्ण मूर्तीचे थाटात आगमन झाले.
मालवण शहरच्या प्रवेशद्वारावरील जरिमरी मातेच्या मंदिरापासून ह्या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या ताला सूरांत ही मिरवणूक काढण्यात आली. जरिमरी मातेच्या मंदिरापासून मालवण शहरातील प्रवेशाच्या मुख्य रस्त्याने कुंभारमाठ, ऑक्ट्राय नाका, देऊळवाडा महापुरूष मंदिर ते श्री देव नारायण मंदिर असा ह्या मिरवणुकीचा मार्ग होता.
श्री देव नारायण मंदिर प्रांगणात ही मिरवणूक आल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आलं तसंच श्री देव नारायण मंदिरा भोवती ग्रंथ दिंडीद्वारे प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.
या सोहळ्या अंतर्गत उद्या २४ मे पासून दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत, श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन (संहिता वाचन), श्री विष्णू देवतेस सहस्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्र नामावलीसहीत देवीला कुंकूमार्चन तसंच आयोजकांकडून ५ वर्षे ते ९ वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न होणार आहेत. हे सर्व विधी 'संपूर्णपणे निःशुल्क' आहेत.
पुणे येथील सुप्रसिद्ध निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांचे संध्याकाळी ४:३० ते ८:३० या वेळेत श्रीमद् भागवत महापुराणातील कृष्णलीलांचे मराठीतून निरूपण होईल.
या श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक भागवत भक्तांनी केले आहे.
या सोहळ्याला मालवण ग्रामदेवतांचे आशीर्वाद, देवस्थान संबंधित विश्वस्त, मान्यवर, समस्त गांवकर मंडळी यांचे सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
मालवण शहरातल्या श्री देव नारायण मंदिर प्रांगणात कृष्णनगरी साकारताना ह्या सोहळ्याच्या आयोजनाची संकल्पना प्रत्यक्षात पूर्णत्वास जात असताना उत्साह द्विगुणीत होत असल्याची प्रतिक्रिया आयोजक व भगवत भक्तांच्या वतीने देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)