ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील सेतूसेवा केंद्र तात्काळ सुरु करायची मागणी..
काळसे येथील रहिवासी संतोष सावंत यांचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना निवेदन.
ओरोस | प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील सेतू सुविधा केंद्र गेली दोन वर्षे बंद ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी हे सुविधा केंद्र तात्काळ सुरू करावे. अशी मागणी काळसे मालवण येथील रहिवासी संतोष महादेव सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून सर्व शासकीय यंत्रणा तसेच खाजगी यंत्रणा व दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे सिंधुदुर्गनगरी येथील सेतू सुविधा केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्ह्याचे मध्यवर्ती कार्यालय ओरोस- सिंधुदुर्गनगरी येथे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, तसेच विविध आस्थापना या ठिकाणी आहेत. याठिकाणी येणाऱ्या जिल्हाभरातील नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती, निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांना सेतू सुविधा केंद्र मध्ये विविध प्रकारचे दाखले, प्रतिज्ञापत्र, संमती पत्र, हमीपत्र, ना हरकत दाखले, तसेच जात पडताळणी साठी लागणारे सर्व प्रकारचे प्रतिज्ञापत्र, याबाबत मोठी गैरसोय झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला असून दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरळीत झाले आहेत .कोरोना बाबत आवश्यक ती खबरदारी घेत दुकाने, हॉटेल, बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था, कार्यालये, सुरू झाली आहेत. असे असतानाही सिंधुदुर्गनगरी येथील सेतू सुविधा केंद्र मात्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे जिल्हाभरातून येणार्या नागरिकांना मनस्ताप होत आहे. तरी याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने गेली दोन वर्षे बंद असलेली सेतू सुविधा केंद्र तात्काळ सुरू करून सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी. अशी मागणी काळसे येथील रहिवासी संतोष सावंत यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)