विलवडे येथील तरुणाची वाफोली माळरानावर आत्महत्या..!
बांदा : राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील विलवडे येथील महेश दशरथ दळवी (२८) या तरुणाने तणनाशक औषध पिऊन रविवारी वाफोली माळरानावर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महेशने तणनाशक प्राशन केल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी त्याला तातडीने प्राथमिक उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती ढासळत गेल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथे नेत असताना वाटेत रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
याबाबत सोमवारी सकाळी रावजी वसंत दळवी यांनी बांदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. दुपारी बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तणनाशक प्राशन केल्याने महेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बांदा पोलिसांनी वाफाेली माळरानात विष घेतलेल्या जागेवर जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. महेशच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)