कांदळगांव ते मालवण मार्ग धार्मिक व पारंपरिक उत्साहात सजला...!
कांदळगांव ते मालवण मार्ग धार्मिक व पारंपरिक उत्साहात सजला...!
मालवणात श्री देव रामेश्वर कांदळगांव, शिवराजेश्वर आणि भवानी मातेच्या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्याचा उत्साह.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया, आदिशक्ती भवानी माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, राणे, परब मानकरी, गावघर व स्थत मंडणासह किल्ले सिंधुदुर्ग, मालवण येथे आज शुक्रवार २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कांदळगाव येथून रवाना होणार आहेत. या सोहळ्यासाठी कांदळगाव ते मालवण धक्क्यापर्यंत मार्गावर अनेक ठिकाणी देवांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे. रांगोळ्या, भगवे ध्वज, स्वागत कमानी, गुढ्या यांनी कांदळगांव ते मालवण मार्ग सजला आहे.
कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर २३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग किल्ला भेटीवर निघणार आहेत. कांदळगाव येथून ओझर ते कोळंब ते मालवण बंदर जेटी व तेथून सिंधुदुर्ग किल्ला अशी श्री देव रामेश्वराची मार्गक्रमणा आहे. ओझर, खडवण नाका, कोळंब, धुरीवाडा तसेच मालवण शहरात ठिकठिकाणी रामेश्वराचे स्वागत करण्यात येणार असून यासाठी मंडप व स्वागत कमानी उभारून सजावट करण्यात आली आहे. रस्त्यावर रांगोळ्या, रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका, आकर्षक गुढ्या उभारून सजावट करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार व सरबत व्यवस्था करण्यात येणार आहे. या भेटी दरम्यान रामेश्वर ज्या ज्या ठिकाणी भेटी देणार अशा मेढा येथील जोशी मांड, किल्ले सिंधुदुर्ग, दांडी येथील दांडेश्वर मंदिर, मेढा मौनीनाथ मंदिर, कुशे वाडा, बाजारपेठ रामेश्वर मांड, कोळंब अशा विविध ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
२३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता श्री देव रामेश्वर आपल्या पंचायतन, वारेसुत्र, पालखी, तरंग व भाविक रयतेसह मालवण जोशी मांड येथे मार्गस्थ होणार. दुपारी १२ वाजता जोशीमांड मेढा, मालवण येथे उपस्थितांना अल्पोपहार, नंतर समुद्रमार्गे होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे प्रवास. पुढे किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात देव रामेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक भेट सोहळा होणार आहे. भवानी माता मंदिर येथे श्री देव रामेश्वर आणि आदीमाया, आदिशक्ती आई भवानी यांचा भेट सोहळा नंतर रितीरिवाजाची कामे होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता किल्ले दांडेश्वर मंदिर, दांडी येथे होडीतून परतीचा प्रवास. त्यानंतर तेथून मौनीनाथ मंदिर-मेढा मालवणच्या दिशेने मार्गक्रमण, रात्री मौनीनाथ मंदिरात पोहोचल्यावर पालखीचा तेथे मुक्काम तसेच उपस्थित सर्वांसाठी मौनीनाथ मंदिर व कुशेवाडा येथे महाप्रसाद होणार आहे.
शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मौनीनाथ मंदिरात पारंपरिक विधीवत पूजा - अर्चा झाल्यानंतर भाविकांना आशीर्वचन देऊन श्री देव रामेश्वर आणि सर्व वारेसुत्र, पालखी, तरंग पुढे कुशेवाडा येथे मार्गस्थ होतील. कुशेवाडा येथे पोहोचल्यावर प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वचन देऊन रितीरिवाजाची कामे पूर्ण करून पालखी पुढे रामेश्वर मांड, मालवण बाजारपेठ येथे मार्गस्थ होईल. दुपारी १ वाजता रामेश्वर मांड, बाजारपेठ मालवण येथे भाविकांना दर्शन व आशीर्वचन, त्यानंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी आणि भंडारी हायस्कूलच्या पाठीमागील हॉलमध्ये भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगावला परतीचा प्रवास. रात्री ८ वा. देव महापुरुष देवस्थान (मांगरी) कोळंब येथे पालखी, तरंग यांचे त्या दिवसासाठी विसर्जन आणि मुक्काम नंतर गणेश (अवि) नेरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, २५ जानेवारी रोजी दुपारी १ वा. व रात्री १० वाजता कोळंब महापुरुष देवस्थान येथे महाप्रसाद, नंतर आशीर्वचन देऊन देव रामेश्वर, इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, भाविक आणि गावघर, कांदळगाव स्वगृही परतीच्या प्रवासाला निघणार. वाटेत आशीर्वचन देत देत रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे या ऐतिहासिक तीन दिवसीय सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव, मानकरी व ग्रामस्थांनी दिली आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...