कशेडी बोगदा परिसरात खाजगी बस जळून खाक..!
चालकाचे प्रसंगावधान आणि सर्व प्रवाशी सुखरुप.
ब्यूरो न्यूज : एका खासगी बसचा रविवारी पहाटे रत्नागिरीतील कशेडी बोगद्याजवळ अपघात झाला. या बसला भीषण आग लागली आंणि आगीमध्ये ही बस संपूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्सची ही लक्झरी बस मुंबईहून सिंधुदुर्ग कडे जात होती. या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. रविवारी पहाटे कशेडी बोगद्याच्या परिसरातून जात असताना या बसचा टायर गरम झाला. टायरने पेट घेतला. आग वेगाने पसरायला सुरुवात झाली. ही गोष्ट बसचालकाच्या लक्षात आली. त्याने तातडीने प्रवाशांना सावध करुन बसमधून खाली उतरवले. त्यानंतर बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली आहे. खेड अग्निशमन दलाला तातडीने या घटेनची वर्दी देण्यात आली. यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवली. मात्र, तोपर्यंत प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. त्यांना बसच्या डिकीत ठेवलेले हे सामान बाहेर काढायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे आगीमध्ये हे सर्व सामान जळून खाक झाले. सुदैवाने एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. यानंतर संबंधित प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)