ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तळाशिलवाडी ग्रामस्थ १५ ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तळाशिलवाडी ग्रामस्थ १५ ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम.

प्रकाशन: 11 Aug 2025 08:50 PM
वाचन संख्या 209


मालवण | ब्यूरो न्यूज : ग्रामस्थांनी तळाशील ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण तहसील कार्यालयात धडक दिली. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत अनधिकृत वाळू उपसा बंद न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील. यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास आम्ही आत्मदहन करू असा इशारा तळाशील ग्रामस्थांनी यावेळी दिला.


Article image


दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत प्रांत ऐश्वर्या काळुशे यांनी ज्या ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे तेथे महसूल, पोलीस आणि बंदर विभागाचे संयुक्त पथक कार्यरत ठेवत कडक कारवाई केली जाईल असे ग्रामस्थांना आश्वासन दिले. त्याचबरोबर कालावल खाडीकिनारी चे परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत त्यांची आजच तपासणी करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.


९ जून पासून वाळू उपसा बंद करण्यात आला आहे अशा परिस्थितीतही कालावल खाडीपात्रात तळाशील रेवंडी या ठिकाणी पाच ते दहा होड्यांद्वारे अनधिकृत रित्या दिवस रात्री वाळू उपसा केला जात आहे या संदर्भात वारंवार प्रशासनाचे निवेदन देऊन लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप करत, संतप्त तळाशील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात धडक दिली यावेळी प्रांत ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वर्षा झालटे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने, तळाशील ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर, केशर जुवाटकर, जान्हवी पराडकर, मंगल केळुसकर, स्नेहा कांदळगावकर, समीना केळुसकर, श्रीकृष्ण कांदळगावकर, पुंडलिक जुवाटकर, रवी कोचरेकर, गणपत शेलटकर, सचिन तारी, नंदकुमार कोचरेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी तोंडवळी गावात कालावल खाडीपात्रात तळाशीलवाडी समोर रेवंडी या ठिकाणी अनधिकृत होड्यांद्वारे दिवस रात्र वाळू उपसा सुरू आहे. तळाशील समोरील कालावल खाडीपात्रात नांगर, दोऱ्या व काठ्या रोवून ठेवल्या आहेत. त्यामुळे तळाशील येथील पारंपरिक मच्छीमारांना मासेमारी करताना अडथळा निर्माण होत आहे. हा वाळू उपसा हरित न्यायालयाची बंदी असलेल्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे एक प्रकारे न्यायालयाचाही अवमान होत आहे. या अनधिकृत वाळू उपसा बाबत अनेकदा प्रशासनास निवेदन देऊन तसेच आंदोलन छेडून वाळू उपसा बंद करण्याबाबत मागणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.


महसूल विभागाने नुकताच महसूल सप्ताह साजरा केला. मात्र अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांकडून शासनाचा महसूल लुटण्याचे काम केले जात आहे. मग महसूल सप्ताह साजरा करून उपयोगच काय? वाळू उपसा बंद असतानाही सध्या सुरू असलेला अनधिकृत वाळू उपसा तुमच्या आशीर्वादाने सुरू आहे का असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी प्रांत व तहसीलदार यांना केला. दररोज सुमारे ८० हून अधिक डंपर मधून वाळूची वाहतूक होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाळू उपसा बंद असेल तर नौका खाडीपात्रात कशा असा प्रश्न उपस्थित करत या नौका पकडून जप्त कराव्यात किंवा नष्ट कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर प्रांत ऐश्वर्या काळुशे यांनी नौका नष्ट करणे तांत्रिक दृष्ट्या अडचणीचे असल्याने या नौका जप्त करण्याची कार्यवाही आपण करू. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.


कालावल खाडिकिनारी सुमारे दीडशेहून अधिक परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. या कामगारांची प्रशासनाकडून तपासणी झाली आहे का? वाळू उपसा बंद असतानाही हे भैया कामगार अद्यापही या ठिकाणी वास्तव्य करून का आहेत याची तपासणी प्रशासनाने केली आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावर प्रांत ऐश्वर्या काळुशे यांनी पोलीस प्रशासनाला आजच कालावल खाडीपात्रालगत वास्तव्यास असलेल्या सर्व परप्रांतीय कामगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी अनधिकृतरित्या वाळू उपसा होत आहे ते ठिकाण कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई आपण करू असे आश्वासन प्रांत काळुशे यांनी ग्रामस्थांना दिले. याचबरोबर ज्या ठिकाणी परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत सरपंच, तलाठी यांना नोटीसा काढण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनास दिले.


या चर्चेनंतर तळाशील ग्रामस्थांनी १५ ऑगस्टला अनधिकृत वाळू उपसा बाबत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत लेखी आश्वासन आणि कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेतली न गेल्यास प्रसंगी आम्ही आत्मदहन करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला.


याबाबतचे निवेदन खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना सादर करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स