आमदार गोपीचंद पडळकर यांनी मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार.
नवलराज काळे | सहसंपादक : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात धनगर समाजासाठी १००० कोटींच्या निधी सह हजारो कोटींच्या निधीची तरतूद करुन धनगर समाजाला न्याय दिल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी हजारो समाज बांधवांना घेऊन मुंबईत विधानभवन परिसरात ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार करुन आभार मानले. धनगर समाजाला दिलेल्या योजना असलेल्या २२ योजनांचे एकत्रीकरण करून मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीच्या मार्फत ही अंमलबजावणी करण्यात येईल.
महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. धनगर समाजाला १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करुन मुख्यालय करण्यात येईल ,राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार आहेत. धनगर समाजासाठी २५,००० घरे बांधणार आहेत तर धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना राबविण्यात येणार आहे.
अशा वेगवेगळ्या योजना राबवून धनगर समाजाला सामाजिक, आर्थिक प्रगती कडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्री गिरीश महाजन, माजी आयपीएस अधिकारी मधू शिंदे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच यावेळी राज्यभरातून शेकडो ढोलकरी तसेच हजारोंच्या संख्येने मेंढपाळ व समाज बांधव उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)