शहिद मेजर कौस्तुभ रावराणे यांचा चौथा स्मृतिदिन ७ ऑगस्टला..!
सडूरे रवळनाथ मंदिर येथे होणार स्मृतीजागर..!
वैभववाडी | नवलराज काळे :
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले वैभववाडीचे सुपुत्र मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त रविवार दिनांक ७ ऑगस्टला मुळगावी सडुरे येथे स्मृती जागर कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त शाहीर राजु राऊत यांचा पोवाडा होणार आहे. या स्मृतीजागरात तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कौस्तुभ रावराणे मित्र मंडळां कडुन करण्यात आले आहे.
काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे यांना ७ ऑगस्ट २०१८ ला वीरमरण आले होते. वैभववाडीतील सडुरे गावचे सुपुत्र असलेल्या मेजर रावराणे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी नुकतीच येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात कौस्तुभ रावराणे मित्रमंडळाची बैठक झाली. या बैठकीला सज्जन रावराणे, प्रमोद रावराणे, विजय रावराणे, , प्राचार्य सी.एस.काकडे, संजय रावराणे, राजेंद्र राणे, विश्राम राणे, राजु पडवळ, विनायक रावराणे, मनोज सावंत, संतोष टक्के, विद्याधर सावंत, मुकुंद रावराणे, नवलराज काळे आदी उपस्थित होते.
या बैठकीत स्मृतीजागराचे स्वरूप निश्चित करण्यात आले. मेजर राणेच्या मुळ घरी सकाळी ९.४५ वाजता-प्रतिमा पुजन, १०.१५ वाजता -मानवंदना, त्यानंतर घर ते प्राथमीक शाळा स्मृतीजागर फेरी, ११.३० वाजता श्री.देव रवळनाथ मंदीरात समुहगीतांचे सादरीकरण व व्याख्यान, त्यानंतर लोकप्रिय शाहीर राजु राऊत यांचा पोवाडा होणार आहे.
दरम्यान या स्मृतीजागराची तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. तालुक्यात स्मृतीजागरांची वातावरण निर्मिती व्हावी या हेतुने प्रत्येक गावात आणि मेजर कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना देत असल्याचे फलक लागण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यत ८० ठिकाणी हे फलक लागलेले आहेत. या जागराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)