<em>मच्छीमारांचा आवाज जीनेव्हा(स्वित्झर्लंड-यूरोप) मध्ये सबसिडी बंदी विरोधात घुमला..!</em>
सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांचा सहभाग..!
मालवण | विनीत मंडलीक :
मच्छीमारांना राज्य व केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना जाहीर होत असतात.शाश्वत मासेमारी आणि रोजगारनिर्मिती तसेच देशाचे परकीय चलन वाढावे यांसाठी सदर योजनांवर अगदी ७५%पर्यन्त अनुदान दिले जाते.ट्रॉलर ना डिझेल सबसिडी असो अथवा पारंपारिक रापण व्यवसायिकांना जाळी खरेदीसाठी किंवा मत्स्यवाहतुकी साठी वाहनांना, मत्स्यपालन करण्यासाठी, मच्छीमाराना बंदी कालावधीतील अनुदान,विमा संरक्षण अश्या अनेकविध योजना साठी सदरची सबसिडी दिली जाते.चांदा ते बांदा,निलक्रांति, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना व इतर अनेक योजना मार्फत त्याचा लाभ मच्छीमार, मत्स्य व्यवसायिकांना मिळत असतो.परंतु जागतिक व्यापार संघटना(World Trade Organization)यांनी सदरच्या अनुदानामुळे मासेमारी वाढत असून त्याचा मत्स्यसाठ्यावर परिणाम होत आहे अशी भूमिका मांडली आहे.तसेच त्यासाठी भारता सारख्या विकसनशील देशांना सबसिडी बंद करण्याबाबाबत सूचना केल्या आहेत.त्यासाठी जागतिक व्यापार संघटनेची बैठक, जीनेव्हा(स्वित्झर्लंड)याठिकाणी दि.१२ जून ते १५ जून आयोजित केली आहे.सदर बैठकीत भारतातील मच्छीमारांची बाजू मांडण्यासाठी संपूर्ण देशातून ३४ मच्छीमारांचे शिष्टमंडळ जीनेव्हा(स्वित्झर्लंड)गेले आहे.यामध्ये मालवण येथुन सौ.ज्योती रविकिरण तोरसकर यांचा समावेश त्याचबरोबर महाराष्ट्रातून गणेश नाखवा,अमोल रोगे, मोरेश्वर वैती यांचा समावेश आहे.सौ.ज्योती यांनी आमची मासेमारी ही उपजीविका साधन असून त्याच्यावरील सबसिडी बंद केल्यास त्याचा थेट परिणाम मच्छीमारांच्या अर्थ आणि कुटुंब व्यवस्थेवर होईल अशी भूमिका मांडली.तसेच समुद्र आमचे दैवत असून त्याला ओरबडण्याचं काम आमच्या मच्छीमारा कडून कधीही होणार नाही असे सांगितले.त्यांच्या या भूमिकेचे विविध मच्छीमार संघटना नि स्वागत केले आहे.भारतातून सदर बैठकीत सहभागी असलेल्या चार महिला मध्ये सौ.ज्योती तोरसकर यांचा समावेश आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)