बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचा "गुरुवर्य य.बा.चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार" गुरुनाथ ताम्हणकर यांना जाहीर...!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने दिला जाणारा गुरुवर्य य.बा. चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नंबर १ चे उपशिक्षक श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण साने गुरुजी पुण्यतिथी दिवशी म्हणजेच ११ जून २०२२ रोजी दुपारी ठिक साडेतीन वाजता बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा येथे होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून ॲड.देवदत्त परुळेकर, अध्यक्ष बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर आणि जिल्हा परिषद प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे हे उपस्थित राहणार आहेत.
श्री गुरुनाथ ताम्हणकर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेली वीस वर्षे सेवा करत असून विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. शिष्यवृत्ती परीक्षा, सहशालेय उपक्रम, विविध स्पर्धा यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात. ताम्हणकर गुरुजी स्वतः उत्तम कथा निवेदक आहेत. कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा या सर्व स्पर्धा त विद्यार्थ्याना सहभागी करून घेतात. व त्यासाठी विशेष मेहनत घेतात. त्यामुळे सर्व स्पर्धात विद्यार्थी गुणवंत ठरतात.
विज्ञान प्रदर्शनात शाळेसोबत च वैयक्तिक सहभाग, जिल्हा स्तर, तालुका स्तर शैक्षणीक साहित्य व लोकसंख्या शिक्षण यात बक्षिसे मिळवली आहेत.
गणित विषय आवडीचा असून शिकवण्यातही हातखंडा आहे. गतवर्षी मालवण तालुक्याने तयार केलेल्या विद्यालय ॲप निर्मितीत त्यांनी महत्व पूर्ण भूमिका बजावली आहे.
माळगाव पंचक्रोशी ग्रंथालयाचे सचिव व माळगाव एज्युकेशन सोसायटीचे स्विकृत सदस्य म्हणून ते काम पाहात आहेत.
सेवांगणच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो.
गुरुवर्य या.बा.चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर तसेच सेवांगण कट्टाचे अध्यक्ष किशोर शिरोडकर व श्याम पावसकर यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)