अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मिळाला दिव्यांग बांधवांना आनंदाचा दिलासा.
वाहनांची मंजूरी ते ताबा असा पाच महिन्यांचा होता खडतर कालावधी..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्ग समाज कल्याण विभाग मार्फत अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचालित तीन चाकी सायकलीची मंजुरी देण्यात आली होती. परंतु मागील पाच महिने लाभार्थ्यांना सदर वाहनांचे वाटप झाले नव्हते. दरम्यान या बाबत आवाज उठवताच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील आठ अस्थिव्यंग लाभार्थ्यांना सदर वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांनि याबाबत समाज कल्याण विभागाचे आभार मानले आहेत.
समाजकल्याण निधिमधून प्रत्येकी ८६ हजार रुपये आठ लाभार्थ्यांना मंजुर झाले होते. परंतु पूर्ण रक्कम जमा झाल्याशिवाय गाडी न देण्याचं शोरूम कडून सांगण्यात आल्याने मागील पाच महिने या लाभार्थ्यांना आरटीओचे पासिंग होऊन सुद्धा गाड्यांच्या प्रतीक्षेत रहावे लागल्याची माहिती लाभार्थ्यांच्या वतीने कमलकांत मेस्त्री यांनी दिली होती. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे खरेदीसाठी रक्कम नसल्यामुळे शो रूममध्ये जाऊन ऍडव्हान्स चेकद्वारे प्रतिज्ञापत्र करून गाडी देण्याची विनंती केली असता पूर्ण रक्कम जमा झाल्याशिवाय गाडी न देण्याचं सांगण्यात आले होते.
पाच महिने होऊन गेले तरी सामाज कल्याण अधिकाऱ्यांना फोन केला तरी कुठल्याही प्रकारची माहिती भेटत नसल्याने लाभार्थी हवालदिल झाले होते. या गाड्या लाभार्थ्यांच्या नावे झालेल्या असून या गाड्या आर. टी. ओ. पासिंग सुद्धा झालेल्या होत्या. पण नावावर झालेल्या गाड्या कुठल्याही अपंगाच्या ताब्यात दिलेल्या नव्हत्या. गाड्या मंजूर झालेल्या अपंग लाभार्थ्यांना याबाबत त्रास सहन करावा लागत होता. पालकमंत्री यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन अपंगांना होणारा त्रास दूर करावा असेही आवाहन या लाभार्थ्यांनी केले होते.
या गाड्या कमलाकांत राजाराम मेस्त्री, बापू रामचंद्र पडवळ, तारक किशोर महाकाळ, राकेश श्रीकृष्ण गावंडे, नारायण श्रीधर परब, दिगंबर गंगाराम कदम, किशोर विलास सुतार,रोशन राजेंद्र तळावडेकर या लाभार्थ्यांना मंजूर झाल्या. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या लाभार्थ्यांना वाहनांचे वाटप करण्यात आले. स्वयंचलित सायकल वाटप करताना वैभववाडी पंचायत समितीचे श्री लांबोरे, सापळे ऑटोचे राजेश सापळे, एकता दिव्यांग विकास संस्था सचिव सचिन सादये,आदेश कारेकर, यलपा कटीमनी आदी उपस्थित होते. समाज कल्याण अधिकारी श्याम चव्हाण यांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभल्याचे लाभार्थ्यांनि सांगितले. वैभववाडी येथील किशोर सुतार यांनी सर्वांचे स्वागत केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)