वर्ष झाले चेंज.... पण टाॅवरला नाही रेंज..!
मोबाईल टॉवर उभारला पण कार्यान्वित कधी करणार असा काळसे धामापूरमधील शेकडो ग्राहकांचा सवाल.
ग्रामस्थांनी टॉवरसाठी केलेल्या उपोषणास २६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण.
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे आणि धामापूर गावात कोणतेच मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांनी गेल्यावर्षी म्हणजेच २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसून आंदोलन केले होते आणि नंतर पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन खासदार विनायक राऊत यांनी काळसे गावातील नियोजित जागेवर बी. एस. एन. एल. टॉवर उभारणीसाठी तातडीने निधी मंजूर केला. आणि १५ फेब्रुवारी २०२१ रोजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते काळसे माळकेवाडी येथे मोबाईल टॉवर उभारणीचे भूमीपूजन करण्यात आले आणि प्रत्यक्ष टॉवर उभारणीच्या कामास सुरुवात झाली.
त्यानंतर थोडस धिम्या गतीने का होइना पण ऑक्टोबर २०२१ ला बीएसएनएल चा मोबाईल टॉवर उभारण्यात आला. पण त्यानंतर तीन महिने उलटून गेले तरी सदर टॉवर कार्यान्वित करण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याबद्दल काळसे धामापूर गावातील शेकडो मोबाईल ग्राहकांनी नाराजी व्यक्त करून मोबाईल टॉवर तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
काळसे, धामापूर सह आजूबाजूच्या पेंडूर , आंबेरी या गावांनाही सदर टॉवर कार्यान्वित झाल्यावर नेटवर्क मिळणार आहे. या गावांमध्ये कुठलेच नेटवर्क नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचणी येत आहेत. तसेच लॉकडाउन कालावधीत वर्क फ्रॉम होम पध्दतीने घरी राहून काम करणाऱ्या नोकरदार कर्मचाऱ्यांनाही मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे काम करण्यात अडथळे येतात. त्याचबरोबर येथील अनेक व्यावसायिकांनाही नेटवर्क नसल्याचा फटका बसून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी पुन्हा एकदा पाठपुरावा करून बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना काळसे येथे उभारण्यात आलेला मोबाईल टॉवर तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आदेश द्यावेत अन्यथा काळसे धामापूर ग्रामस्थ पुन्हा उपोषण करून आंदोलन करतील असा इशारा काळसे धामापूर ग्रामस्थांनी दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)