ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'आजोळ...!' नात्यांचे सर्वात श्रीमंत ठिकाण. (कृतज्ञता विशेष)

'आजोळ...!' नात्यांचे सर्वात श्रीमंत ठिकाण. (कृतज्ञता विशेष)

प्रकाशन: 20 Nov 2021 10:15 PM
वाचन संख्या 167

मालवण | संपादकीय विशेष : ‘आजी’ ही जाणीव नातवांसाठी वयानुरुप बदलत जात नाही. ती कायम आजीच असते. वडिलांइतकीच तिच्याबद्दल सुपरह्युमनची सुरक्षित भावना असते . आईची आई असेल तर त्याजागेला आणखीन एक जादाची अशी मऊ गादीही असते. नातवंडे जाणत असतातच की आजोळ हे नात्यांमधील एक सर्वात श्रीमंत ठिकाण आणि त्याठिकाणच्या प्रत्येक सुखाची चावी आज्जीकडे असते. ‘जावयाचे पोर…..’, कसेही असले तरिही आईच्या आईची माया त्या नातवंडासाठी जास्त किंवा कमी अशी जरी मोजता आली नाही तरिही ती माया थोडी वेगळी असते.
नातवंडांच्या भूमिकेतून पहाताना आजी आणि मामा-मामी ही नाती म्हणजे प्रत्यक्ष मामाची बहिण म्हणजे आई किंवा आईची नणंद म्हणजे मामी वगैरे गुंत्यांपेक्षा “मामा,मामी आणि आजी” अशा मायेच्या आजोळी गुंफत गेलेली असते. बाल्य संपून किशोर अवस्थेत जाताना युवक युवतींसाठी (नातवंडांसाठी) ह्याच आजोळची एक अनामिक धीराचीही देणगी असते.
वडिल किंवा काका हे कर्मनिष्ठ, वस्तुनिष्ठ व व्यावहारिक विचार करुन जीवन सक्षम करणारी माणसे जेंव्हा ‘ मामा ‘ या भूमिकेतून जातात ना तेंव्हा त्यांची आपल्याच मुलांसमोर व पुतण्यांसमोर उडलेली तारांबळ पाहणेही खूप रंजक ठरते.
आजोळची म्हणजेच आईच्या माहेरची आजी म्हणजे एक निःस्वार्थाचीच ज्योत म्हणता येईल. चार आठ दिवस माहेरपणाला येणारी मुलगी आणि तिची मुले यांना कणभरही तसदी पडू नये म्हणून स्वतःसोबतच अगदी सर्व कुटुंबाला ती सावध ठेवत असते. आजीने मामाला व आईला म्हणजेच तिच्या मुलांना लहानपणी कडक संस्कार दिल्याचेही अविश्वसनीय दाखले हे नातवंडांना पटणारे नसतात. परंतु ऐकताना नातवंडांचे भरपूर रंजन होते. भूतकाळातील आई आणि मामाच्या भांडणाचे किस्से ऐकताना ‘मामाच्या अनेक लीला’ आणि आईची हतबलता किंवा तिचाही पलटवार ऐकवता ऐकवता आजी जेऊखाऊ घालून झोपवूही शकते.
खरेच आजोळ हे सर्वात ‘श्रीमंत नात्यांचे ठिकाण…!’ मग ते आजोळ एखाद्या उद्योगपतीचे घर असो,एखादी सदनिका असे,एखादी हवेली असो,चिरेबंदी वाडा असो,तात्पुरत्या फिरत्या बिर्हाडांची झोपडी असो किंवा पत्र्याच्या चाळीतील दहा बाय दहाची खोली असो…
आजोळ श्रीमंत असते…!
माझ्या आईची आई ही अशीच होती . तिने आजोळची गडगंज श्रीमंती आमरण जपलेली होती .कष्ट ,दुःख वेदना तर सर्वांच्याच आज्या पणज्यांनी उचलल्याचे सांगितले जाते..माझ्याही आजीने तिच्या ऐन तारुण्यात इमारत बांधकामाच्या साईटवर घमेली उचलल्याच्या सत्यकथा आहेत. ज्वारी,बाजरी, गहू वगैरे मुबलक परंतु तांदूळ किंवा भात हे सणावारांचे अप्रूप असलेल्या एका सुपिक गावात तिचा जन्म झाला होता. ते गांवही धरणक्षेत्रात आल्यामुळे त्यावेळी संपूर्ण गांव रिकामे केले गेले होते आणि आजीला तिची आई मुंबईला घेऊन आली होती. माझी पणजी अवघी पस्तीस छत्तीस आणि आजी सोळा सतरा अशा वयांमध्ये त्या दोघी मुंबईत कशा जगल्या व तरल्या होत्या त्याच्या अनेक कथा आमची अंगाईही होत्याच. रेशन दुकानावर पावती लिहून फाडायचे काम, इंधन बचत व्हावी मालाडच्या तबेल्यातून शेण आणून चाळीसमोरील खडकावर त्या सुकवणे व सोबत इतर चाळकरी मंडळींनाही इंधन बचत व्हावी आणि त्यांनी शेणाबद्दल कुरकुर करु नये म्हणून शेणाच्या दोन खेपा जास्तीच्या आणून चाळकरी लोकांची  मर्जी राखणे हेही काम ती  करत होतीच जेणेकरून तिचे मासिक अंदाजपत्रक नीट चालत राहील.
लहानपणी तिच्या  मोडी लिपीशी जवळीक साधत आलेल्या पत्रांची अक्षरे आज डोळ्यांसमोरुन तरळत जातायत. टाईपरायटर किंवा डिजिटल कि पॅटच्या आखीवपणापेक्षाही हवीहवीशी ती अक्षरे सजीव वाटतायत. त्याच एकेका पत्रात सुखदुःखांचे थेंब आणि आईसाठीचा धीर पार्सल होऊन आलेला असायचा. ते आणणारा पोस्टमनसुद्धा आजीचाच खास मर्जीतला माणुस वाटायचा. कधी आजी आपल्याकडे आली की पोस्टमननाही येताना एखादी भेट आणल्याशिवाय राहतच नसे.
आजीच्या भेटीही श्रीमंत…विविध प्रकारचे पापड,चिकोड्या,कुरडया लोणची,तिच्या साडीच्या गोधड्या….आणि शंभरची एक मौल्यवान नोट..!
आजोळहून येणे म्हणजे प्रचंड कष्टाचा दिवस आणि प्रसंग.”काळजी घे…काळजी घे गं…” म्हणणारे मामा ,मामी,शेजार पाजारी आणि लेकीला परतताना पाहून अक्षरशः कोसळलेल्या आजोबांनाही वडाचे झाड बनून आधार देत डोळे पुसणारी नात्यांची श्रीमंत परंतु निर्व्याज सावकारीण म्हणजे आजी…आईची आई.!
छोट्या छोट्या गोष्टींतून स्वावलंबन, सहकार याचे धडे मिळविणे ही आजची काळाची स्वतंत्र शिकवणी गरज बनलेली आहे. ‘आजी’ हे तत्व तिच शिकवणी बिनबोभाट घेत आलेले असते परंतु तो आजोळच्या सहवासाचा कालावधी खूप अल्प असतो .त्या अल्प कालावधीत आजीला नातवंडांसाठी खूप काही सूचकपणे सांगायचे असते परंतु ती ते अल्प सहवासामुळे तिच्या विवित किस्स्यांमधून ऐकलं पहात असते. नातवंडांनी त्यातिल सत्व घेत घेत झोपायचे असते.
आता जगातील सर्वात श्रीमंत नात्याचे ठिकाण म्हणजे आजोळ अचानक ” महागडेही” वाटू लागले आहे. मामा मामी भावंडे ही सगळी आपलीच असली व सोज्वळ असली तरिही आजोळ म्हणजे उंची महागडी वस्तू वाटू लागलीय.
भ्रम,दुःख किंवा काहीही असो….वयोपरत्वे प्रगल्भ व व्यावहारिक होत जाणारे मन एकच गोष्ट सांगत असते,” आजोळची श्रीमंती आता….परवडणार नाही…महागडी वाटतेय.!”
आता माहिती व प्रसारणाच्या क्षेत्रात आहे आणि आजीचा फोटोही एका डिश एंटेनाच्या पार्श्वभूमीवर आहे… ती ‘कनेक्टेड’ आहेच ….ही आशा..!

(माझी आजी शशिकला चिंतामण परांजपे गेल्याची सहवेदना वार्ता वाचून आपली सिंधुनगरीच्या न्यूज पोर्टल वाचकांनी , इतरही डिजिटल व प्रिंट चॅनेल्सच्या सहकारी पत्रकार बंधुंनी आणि संपूर्ण आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या टीमने सांत्वन करुन आम्हा कुटुंबियांना धीर दिलाय म्हणून विशेष कृतज्ञता.)

सुयोग पंडित .(मुख्य संपादक)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स