शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश…!
छत्रपतींचा इतिहास जागवलेल्या एका ऐतिहासिक माणुसपर्वाची अखेर..!
ब्युरो न्यूज | वैभव माणगांवकर : ज्येष्ठ इतिहासकार व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाणता राजा या महानाट्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडला व घराघरात पोहचवला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया झाल्यामुळे पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने आज सोमवारी पहाटे ५ वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र घराघरात पोहचवण्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मोलाची भूमिका राहिली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याच्या इतिहासातील गोष्टी त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केला. जाणता राजा या महानाट्यातून त्यांनी शिवसृष्टी निर्माण करत छत्रपती शिवरायांचा इतिहास जनतेसमोर प्रत्यक्षात मांडण्याचाही प्रयत्न केला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.
रविवार सायंकाळपासून त्यांच्या प्रकृतीविषयी राज्यभर जाहीर चिंता जाणवली होती. इतिहास जागवलेल्या एका माणुसपर्वाची अखेर झाली अशीच भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)