ताज्या बातम्या
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी. मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात. देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देऊ पहाणारा जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम. कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू. हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग.
देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देऊ पहाणारा जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देऊ पहाणारा जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम.

देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देऊ पहाणारा जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम.

Article image

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून नऊ दिवस, नऊ रंग आणि महिला - बालकल्याण विभागातर्फे विविध कायदे, योजना, मदत यंत्रणांच्या माहितीचा सर्वसामान्यांसाठी जागर.


सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून महिला व बालकांच्या संरक्षण, सक्षमीकरण आणि कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘नवदुर्गा’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ वेगवेगळ्या रंगांच्या संकल्पनेतून महिला व बालकल्याणाशी संबंधित महत्त्वाचे कायदे, योजना आणि मदत यंत्रणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून मुलींचे संरक्षण व शिक्षण, मातृत्व लाभ, बालकांचे हक्क, महिलांची कार्यस्थळावरील सुरक्षितता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण आणि संकटग्रस्त महिला व बालकांसाठी उपलब्ध मदत यंत्रणा अशा विविध विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यासोबतच आवश्यकतेच्या वेळी मदत कुठे आणि कशी मिळवावी, याचीही माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.


उपक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनातून मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि सन्मान यांचा संदेश देण्यात येत आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, स्त्रीभ्रूणहत्येला प्रतिबंध करणे, बालविवाह रोखणे आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, हे या अभियानाचे महत्त्वाचे उद्देश आहेत.


मुलींचा जन्म आनंदाने स्वीकारणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित व सन्मानपूर्ण वातावरण निर्माण करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. या दृष्टीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.


नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मातृवंदना योजना, तिसऱ्या दिवशी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो), अनाथ प्रमाणपत्र आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, चौथ्या दिवशी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३, तर पाचव्या दिवशी हेल्पलाइन क्रमांक आणि सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देण्यात येणार आहे.


सहाव्या दिवशी सखी वन स्टॉप सेंटर, सातव्या दिवशी शासकीय अंकुर महिला वसतिगृह आणि बालगृह, आठव्या दिवशी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ व हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१, तर नवव्या दिवशी लेक लाडकी योजनेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.


या नऊ दिवसांच्या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ महिला अधिकारी मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत. प्रत्येक दिवसाच्या विषयानुसार संबंधित योजनांची माहिती, कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध मदत यंत्रणांविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.


नवरात्रीतील देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देत महिलांना सुरक्षितता, सन्मान आणि स्वावलंबन मिळवून देणे, तसेच प्रत्येक बालकाला संरक्षण आणि विकासाची संधी उपलब्ध करून देणे, हा ‘नवदुर्गा’ उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. शासनाच्या योजनांची माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून महिला व बालकल्याणाच्या कार्यात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स