वैभववाडी रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.
वैभववाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, वैभववाडी रेल्वे स्टेशन हे प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन आहे. या स्टेशनवरुन वैभववाडीसह देवगड व गगनबावडा तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. या स्टेशन वरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री वैष्णव यांची लवकरच भेट घेणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असेही मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आश्वासित केले.
यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, नेहा माईणकर, शारदा कांबळे, रोहन रावराणे, अतुल सरवटे, संजय सावंत, प्रकाश पाटील, प्रकाश सावंत, देवानंद पालांडे, रेल्वे अधिकारी श्री. बापट, पीआरओ सचिन देसाई व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, ज्या कामाचे भूमिपूजन आम्ही करतो, त्याचे उद्घाटनही आम्हीच करतो. त्याचे हे उदाहरण आहे. जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, माजी मंत्री विनोद तावडे, मी स्वतः या स्टेशन वरील प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत. या स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आपण लवकरच निधी उपलब्ध करून देणार. नेत्रावती गाडीसह इतर गाड्यांना थांबा देण्यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल.
तिकीट सुविधा तसेच लाईट सुविधा उपलब्ध करून देणार असे आश्वासन रेल्वेचे अधिकारी बापट यांनी दिले. प्रमोद रावराणे यांनी तिकीट घर तसेच नेत्रावती गाडी तसेच अन्य सुविधा बाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. पादचारी पुलाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे व भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रवासी व नागरिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)