तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक संपन्न.
डिजे वापरावर बंदी.
मालवण | ब्यूरो न्यूज : श्री. गणेशोत्सव काळात मालवण तालुक्यात डीजे लावण्यावर बंदी असणार आहे. नियमांचा भंग करून डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी गणेशोत्सव नियोजन बैठकीत दिला.
मालवण तालुक्यातील गणेशोत्सव नियोजनाच्या दृष्टीने मालवण तहसील कार्यालयात तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, सहाय्यक महसूल अधिकारी शिवराज चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका, एसटी प्रशासन आदी विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी तसेच व्यापारी व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवाच्या दृष्टीने विविध गोष्टींवर तसेच भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. मालवण शहर तसेच तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते खराब झाले आहेत, त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यात यावेत, अशी सूचना यावेळी मांडण्यात आली. यावर तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी येत्या तीन दिवसात खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेला दिले.
रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांवर लावलेले विविध राजकीय बॅनर व अन्य बॅनर काढण्यात यावेत अशी सूचना मांडण्यात आली. मालवण शहरात ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागा बनविण्यात आल्या आहेत तेथे पार्किंगचे व्यवस्थित मार्किंग करून घ्यावे. गणेशोत्सव काळात एसटी प्रशासनाने ज्यादा गाड्या सोडाव्यात, मालवण बाजारपेठेत एसटी बस व मोठ्या गाड्यांना बंदी असणार आहे, तसेच बाजारपेठेत दुचाकी वाहतुकीस परवानगी द्यावी की न द्यावी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी तहसीलदारांनी सांगितले.
गणेश मूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात यावी. धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करण्यात येऊ नये, अशा सूचना तहसीलदारांनी केल्या. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारी केली आहे, शहरातील वीज व स्ट्रीट लाईट बाबत काही समस्या असल्यास नगरपालिकेशी संपर्क साधावा, गणेशोत्सव काळात दुर्घटना घडल्यास नगरपालिकेने अग्निशमन बंब तत्पर ठेवावा, नगरपालिकेने मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा, असेही तहसीलदारांनी सांगितले. तर गणेशोत्सवासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येणार असल्याने मालवण एसटी स्टॅन्ड येथे आरोग्य सेवेसाठी बूथ लावण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
गणेशोत्सव काळात तालुक्यात सर्वत्र सुव्यवस्था ठेवण्यासाठी आणि योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. उत्सवाच्या काळात नागरिकांनी व गणेश मंडळानी नियमांचे पालन करावे, गणेशोत्सव शांततेत आणि विनासायास संपन्न होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग, पोलीस यंत्रणा, व्यापारी, नागरिक व मंडळे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.