कुडाळात चर्चला आग.
शाॅर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागात आज १९ ऑगस्ट रोजी, सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला आग लागली. नागरिक तसेच कुडाळ न. पं. आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले आणि आग विझवली अशी माहिती मिळत आहे.
या आगीत कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी तिथे मोठ्या संख्येने असलेल्या प्लास्टिक खुर्च्या जळाल्या आहेत. 'शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी' असा अंदाज आहे.
कुडाळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर डॉन बॉस्को चर्चची इमारत आहे. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला फिरायला गेलेल्या पत्रकार समील जळवी यांना या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागातून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसला. त्यांनी लगेच आजूबाजूच्या नागरिकांना याची कल्पना दिली. नगर पंचायत आणि एमआयडीसी अग्निशमन यंत्रणाना कल्पना देण्यात आली अशी माहिती मिळत आहे.
इमारतीच्या प्रवेशद्वारच्या भागात इलेक्ट्रिक मीटर आहे. त्या मीटरच्या नजीकच असलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांना लागल्याने आगीचा मोठा भडका उडाला आणि आगीने पेट घेतला. समील जळवी यांनी सर्व नागरिकांना कल्पना दिल्याने. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
दरम्यान ७. २०च्या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कुडाळ नगर पंचायत अग्नीशामक बंब घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली.
नागरिकांच्या आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही, पण सुमारे दिडशे प्लास्टिक खुर्चा जळून गेल्या आहेत अशी माहिती मिळत आहे.
ही घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय भोगटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, पप्पू नार्वेकर, श्री मळगावकर, श्री कोरगावकर तसेच कुडाळ नगरपंचायतचे कर्मचारी, निहाल फर्नांडिस आणि काही ख्रिश्चन समाज बांधव यांनी घटनास्थळी धाव घेतली असे समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)