ओरोस/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत, महाविद्यालयामध्ये लसीकरण सत्राच्या दिवशी उपस्थित राहून लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या करिता त्या त्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे. लसीकरण सत्राच्या ठिकाणी केवळ कोवॅक्सीन लस उपलब्ध असेल. यावेळी केवळ 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. सन 2007 वा त्यापुर्वी जन्म झालेले लाभार्थी पात्र राहतील .लाभार्थ्यांना कोवीन सिस्टिमवर स्व:च्या मोबाईल नंबरव्दारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची सुविधा देखिल उपलब्ध आहे.लसीकरण सत्राची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 अशी राहील.