संस्थेचे सभासद तसेच पंचक्रोशीतील शेतकरी व आंबा बागायतदार यांची मागणी.
शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील साळशी पंचक्रोशीतील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर स्थापन केलेली नोंदणीकृत सहकारी संस्था सध्या बेवारस स्थितीत आहे लाखो रुपयांच्या मालमत्तेला वाली कोण असा प्रश्न पडत आहे. शासन स्तरावर सहकार विभागाने तसेच सहकार चळवळीतील सहकार प्रेमी प्रतिनिधींनी या संस्थेच्या कारभाराचे पुनर्जीवन होऊन येथील सर्वसामान्य शेतकऱी आंबा उत्पादनांना चांगली बाजारपेठ तसेच हमीभाव मिळण्यासाठी ही संस्था पुन्हा पुनर्जीवित होऊन सहकारी तत्त्वावर शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा सध्या व्यक्त होत आहे.
सन १९९२ मध्ये संस्थापक अध्यक्ष कृष्णा केशव ताम्हणकर आणि पंचक्रोशीतील सहकार प्रेमी यांच्या सहकार्याने प्रतिकूल परिस्थितीत ही संस्था नोंदणीकृत केली होती. शेतकऱ्यांना दलालांच्या विळख्यातून सोडवून चांगली बाजारपेठ व शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी संस्थेची स्थापना झाली होती. वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती तसेच बाजारपेठेतील स्पर्धा यामुळे ही संस्था आर्थिक संकटात सापडली होती. कोणतेही कारण न देता सहकार विभागाने सदर संस्था आर्थिक तोट्यात असल्याचे कारण देऊन अवसायनात काढली परंतु अवसायिकाकडून संस्थेचा कारभार सुधारण्याऐवजी जशास तसे परिस्थिती राहून आजच्या स्थितीला या ठिकाणी लाखो रुपये खर्च संस्थेचे बांधलेल्या पॅकिंग ग्रेडिंग सेंटर ची इमारत बेवारस स्थितीत पडून आहे. झाडाझुडपांनी वेढलेल्या या इमारतीला वालीच राहिलेला नाही अशी स्थिती आहे.
या संस्थेला आठ लाख रुपयांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले होते. पणन महामंडळ सिंधुदुर्ग बँक आणि महा मॅंगो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकार्याने ही संस्था काम करत होती. पहिल्या काही वर्षात या संस्थेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालू होते परंतु अनेक संकटात सापडल्यामुळे आर्थिक अडचणी व व्यवस्थापनातील काही त्रुटी या सर्वाला कारणीभूत ठरल्याचे काही संस्थेचे सभासद व संचालकांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत सहकार विभागाने लक्ष देऊन ही संस्था पुनर्जीवीत करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी संस्था सभासद तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बागायतदार यांच्याकडून करण्यात येत आहे. गेल्या वीस वर्षात शेती उद्योग तसेच बागायतदार यांची संख्या वाढलेली असून या पंचक्रोशीतील सर्वसामान्य शेतकऱ्यांना व तरुणांना या संस्थेचा उपयोग होऊन उत्पादित मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळवून देणे साठी संस्था पुन्हा उभी केली जावी अशी मागणी उपस्थित होत आहे.