मसुरे | प्रतिनिधी : माणूस आणि माणसाचे मन हा धम्माचा मुख्य विषय आहे. मन घडवते तसा माणूस घडत असतो. त्यामुळे मनाला घडविण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही प्रक्रिया म्हणजेच धम्मप्रवास होय असे प्रतिपादन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत पाली भाषा अभ्यासक अमित मेधावी यांनी व्यक्त केले. यावेळी दर्पण प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, सचिव सुभाष कदम, दर्पण महिला फ्रंट अध्यक्षा स्नेहल तांबे, सल्लागार डॉ. अशोक कदम, श्रीधर तांबे, प्रज्ञा कदम, संजना तांबे, महेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
अमित मेधावी म्हणाले, मनामध्ये सतत येत असणारे विचार न थांबवता पाहता यायला हवेत. त्यानंतर त्या विचारांची दोन गटात विभागणी करायला हवी ती कुशल आणि अकुशल अशी. कुशल विचारांना सोबत घेऊन कुशल भावनांचा विकास करावा. अकुशल विचार दूर करावेत. ज्यावेळी मनामधील लोभ आणि द्वेष नाहीसा होऊ लागतो, त्यावेळी आपला मनोविकास घडू लागतो. सदाचार, विचारांची स्पष्टता आणि भावनांची शुद्धी या पायरीने पुढे गेल्यानंतर खर्या अर्थाने जीवन बदलते. मैत्री करुणा यांसारख्या कुशल भावनांनी सदोदित भरले गेलेले मन मानवाला खर्या सुखाचा अनुभव प्रदान करते. हाच मनोविकास होय, जो धम्माने सहजसाध्य होतो. पुढे आपले मूळ अस्तित्व याविषयी बोलताना शरीर, संवेदना , चित्त, धम्म स्वतःला ओळखावे,यावरुन आपले अस्तित्व ओळखावे. मनाच्या मुख्य कार्याविषयी बोलताना सांगितले जाणणे,ओळखणे, संवेदन करणे, प्रतिक्रिया देणे,हे मनाचे समाधान व्यक्त करत असते. यावेळी दर्पणचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सिद्धार्थ तांबे, सुधीर तांबे, सुनिल तांबे, निलेश पवार, पूनम कदम, संतोष तांबे,अनिल तांबे, अनुष्का तांबे, विलास तांबे, निवेदक शैलेश तांबे, बौद्ध चारी सिद्धार्थ जांभवडेकर, प्रमोद कासले, प्राध्यापक हेदुळकर तसेच कार्यकारिणी सदस्य मोठया संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल तांबे, आभार सचिव सुभाष कदम यांनी मानले.