बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील महिला, विद्यार्थिनींसह जनतेच्या सुरक्षेसाठी सावंतवाडी पोलिस सदैव तत्पर आहेत. मुलांनी सोशल मीडियाचा वापर सांभाळून करावा. विद्यार्थिंनीना स्वतःच्या संरक्षणासाठी कराटे सारखे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार आहे. कोणीही आपली छेडछाड किंवा वाईट हेतून मस्करी सुद्धा केली तरी तत्काळ शिक्षकांकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करा, त्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले. विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मार्फत महिला सबलीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.
व्यासपीठावर मनसे सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष बाळा परब, उपाध्यक्ष संजू पांगम, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, मिलिंद सावंत, सुनिल आसवेकर, राजेश मामलेकर, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, मुंबईचे मार्शल आर्ट प्रशिक्षक सुधीर काटोले, किरण देसाई, मार्गदर्शक अर्पिता वाटवे, पोलिस हवालदार सुभाष नाईक, महेश निरवडेकर, पोलिस अंमलदार संभाजी पाटील, शाळा समिती अध्यक्ष हेमंत कामत, संचालक गजानन परब आदी मान्यवर उपस्थित होते. अर्पिता वाटवे, हेमंत कामत, किरण देसाई यांनी मार्गदर्शन केले. मिलिंद सावंत म्हणाले की, आपल्या मुली सुरक्षीत कशा राहतील यासाठी संदीप दळवी, गजानन राणे, महेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महिला सबलीकरण अभियान सुरू केले आहे. मार्शल आर्ट आणि ज्युडो कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुषमा मांजरेकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्यध्यापक सदाशिव धुपकर यांनी तर आभार सौ.कामत यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ राजन परब, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.