नांदरुख येथे तुटलेल्या विद्युत भारीत तारेच्या धक्क्याने बैलाचा दुर्दैवी अंत …!
सुदैवाने शेतकरी आणि त्यांची पत्नी बचावली..!
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील नांदरुख – नाईकवाडी येथे तुटून पडलेल्या विद्युत भारीत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा शेतीच्या बैलाचा दुर्दैवी अंत झाला . केवळ दैव बलवत्तर म्हणून काळजीने त्या बैलाला वाचविण्यास गेलेले शेतकरी पती पत्नी बचावले. सोमवारी सकाळी नांदरुख – नाईकवाडी येथील शेतकरी श्री. विजय अनंत चव्हाण हे आपली गुरे चरण्यासाठी रानात सोडण्यास जात असताना त्यांच्या घरापासून अवघ्या काही अतंरावरच तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेचा बैलाला स्पर्श झाल्याने बैल विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यूमुखी पडला. बैलाला वाचविण्यासाठी गेलेले शेतकरी विजय आणि त्यांची पत्नी यानाही काहीसा विजेचा धक्का बसला. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. सदर घटनेची कल्पना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देऊन वीजपुरवठा बंद करण्यात आला. घटनास्थळी नांदरुख सरपंच, तलाठी यांनी पहाणी केली तर पशुवैद्यकिय अधिकारी, वीज वितरण अधिकारी, पोलिस यांनी घटनेचा ठिकाणी येऊन पंचनामा केला. शेतकरी विजय चव्हाण यांचा सुमारे ४५०००/- रुपये किंमतीचा बैल मृत्यूमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. शेतकर्यासाठी शेतीचा व उपजिवीकेचाही आधार असणार्या बैलाचा तुटलेल्या विद्युत भारीत तारेमुळे प्राण जाण्याने संपूर्ण शेतकरी कुटुंबालाच मोठी हानी झाली आहे.