सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस प्रशासन, तालुकानिहाय पोलिस स्टेशन्स आणि एम. के. सि. एल.( महाराष्ट्र नाॅलेज काॅर्पोरेशन लिमिटेड ) यांच्या संयुक्त माध्यमातून सुरु असलेला उपक्रम ; एम. के. सि. एल. चे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांचे तांत्रिक सहकार्य.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला कसे दूर ठेवता येईल याचे विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी केले जाणार तांत्रिक मार्गदर्शन ; १ लाख विद्यार्थी विद्यार्थिनीं पर्यंत पोहोचण्याचा मानस.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस आयुक्त ( एस पी ) श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सायबर सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस प्रशासन व एम. के. सि. एल. चे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांच्या तांत्रिक मार्गदर्शन द्वारे हा सप्ताह आखला गेला असून त्या अनुषंगाने उद्या २० ऑक्टोबरला सकाळी १० : ३० वाजता शहरातील टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल तसेच स. का. पाटील महाविद्यालयाचे ६०० विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मालवण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मालवण पोलिस ठाण्याच्या वतीने दिली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ पणदूर महाविद्यालय येथून झाला असून दिनांक २७ ऑक्टोबरला कुडाळातील मराठा समाज हाॅल येथे याची मान्यवरांच्या उपस्थितीत याची सांगता होईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्यातील १३ पोलिस स्टेशन आणि एम के. सि. एल. (MKCL) ची ६० अधिकृत केंद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व कॉलेज आणि २२० शाळा यांच्या माध्यमातून जवळपास १ लाख विद्यार्थी विद्यार्थिनीं पर्यंत पोहोचण्याचे या अत्यंत व्यापक व आधुनिक जगातील अत्यावश्यक सामाजिक उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हे विशेष मार्गदर्शन सत्र असेल. गुन्हा हा कायदेशीर घटक व युवा पिढीचे शारिरीक, मानसीक आरोग्य अशा विविध बाबतीत हा उपक्रम प्रबोधनात्मक ठरणार आहे.
या सायबर सुरक्षा सप्ताहासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा पोलिस प्रशासन, तालुकानिहाय पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आणि एम. के. सि. एल. चे अधिकृत असोसिएटस् योगदान देत आहेत.