संपूर्ण भारतात मिळवला ६५३वा क्रमांक
विवेक परब / चिंदर : येथील सुभ्रमन्य भालचंद्र केळकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या आज लागलेल्या निकालात संपूर्ण भारतात ६५३वा क्रमांक मिळवून पुन्हा एकदा चिंदर गावासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे…
गेल्यावर्षी त्यांना भारतीय पोलिस सेवा (lPS) मिळाली होती. मालवण तालुक्यातील चिंदर गावातील सामान्य कुटुंबातील मेहनती युवकाने थेट यु पी एस सी परीक्षा पास करणे ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने व खासकरुन चिंदर गावासाठी कौतुकास्पद गोष्ट ठरली आहे.
सुभ्रमन्य यांचे वडील श्री भालचंद्र केळकर पंचक्रोशीत पौरोहित्य सेवा करतात त्यांचे मोठे भाऊ महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारी आहेत. घरची परिस्थिती बेताचीच असून त्यांनी साकार केलेले हे यश उल्लेखनीयच आहे.भाऊ पोलीस दलात लागण्यापूर्वी जेमतेम परिस्थितीच म्हणावी लागेल तरीही जिद्दीने, मेहनतीने, प्रचंड अभ्यासाने सुब्रमण्य यांनी त्यांचे ध्येय गाठले.
सध्या आय.पि.एस.केडर तामिळनाडू ही रॅन्क असलेल्या सुब्रमण्य केळकर यांची पुढे आय.ए.एस.साठी पात्र होण्याची इच्छा असून त्यात लोकसेवा आयोगाच्या पहिल्या तिनशे रॅन्कमध्ये येणे आवश्यक आहे.चिंदरसारख्या ग्रामीण भागात राहूनदेखिल लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रचंड समाधानकारक यश मिळवणार्या सुभ्रमन्य यांनी आय.ए.एस.च्या तयारीलादेखील सुरुवात केली आहे.