सावंतवाडी तालुका पर्यटन महासंघाच्या व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न...!
आम.दिपक केसरकर यांनी सर्वपक्षीय मतभेद विसरून पर्यटन महासंघाची संकल्पना विकसीत करायचे केले आवाहन….!
सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसौंदर्याने संपन्न जिल्हा असुन येथील नैसर्गिक संपदा, जैवविविधता,कला, संस्कृती आणि परंपरा ही साऱ्या जगासमोर आणण्यासाठी आणि शाश्वत विकास व त्यातून रोजगार निर्माण करण्याची सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाची चळवळ कौतुकास्पद असून त्यासाठी पक्षीयभेद वगैरे बाजुला ठेवून महासंघाच्या या संकल्पनेला सर्वानीच सहकार्य करूया असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी केले.
पर्यटन संचनालय व सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसायिक महासंघाच्या सयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील पर्यटन व्यवसायिकांची कार्यशाळा डि. के. टुरिझम माजगाव येथे संपन्न झाली. या कार्यशाळच्या उदघाटनपर संबोधनात केसरकर बोलत होते.
यावेळी उपस्थित असलेले पर्यटन संचनालयाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे यांनी पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटन व्यवसायिकाना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेत सावंतवाडी तालुक्यातील सुमारे पन्नासहून जास्त व्यवसायिकानी सहभाग घेतला. निसर्ग पर्यटनाबाबत श्री संजय नाईक यांनी सविस्तर माहिती दिली तसेच पर्यटन व्यावसायिकांच्या विविध अडचणीबाबत श्री मनोज हाडवळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महासंघाचे जिल्हा सचिव एड. नकुल पार्सेकर यांनी महासंघाची भुमिका आणि भविष्यातील कृती आराखडा मांडला. आभार महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सतीश पाटणकर यांनी केले.
कार्यशाळेसाठी जिल्हा उपाध्यक्ष व संयोजक श्री डि. के. सावंत, सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष श्री जितेंद्र पंडित, श्री दिनानाथ बांदेकर तसेच पर्यटन व्यवसायिक श्री राजन नाईक, श्री प्रमोद सावंत, श्री भाई देऊलकर श्री प्रसन्ना कोदे, श्री अमित बांदेकर, श्री पारकर आदि उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)