कोकिसरेतील भुयारी मार्गाचे भूमिपूजन ४ मार्च रोजी…
सहसंपादक /नवलराज काळे : कोकिसरे येथील रेल्वेच्या फाटकाला पर्यायी मार्ग म्हणून नियोजित भुयारी मार्गाचे भूमिपूजन ४ मार्चला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या शुभ हस्ते होणारा असून या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक आमदार नितेश राणे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भुयारी मार्गाचे काम में २०२४ पूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती पर्यायी मार्गासाठी गेल्या १४ वर्षांपासून पाठपुरावा करणारे भाजपचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे दिली.तळेरे- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोकिसरे येथे असलेले रेल्वे फाटक जवळपास १४ तास बंद राहते. त्यामुळे नाटकाला पर्यायी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग व्हावा, यासाठी २००८ पासून प्रमोद जठार पाठपुरावा करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून भुयारीचा पर्याय मान्य करून ६५ कोटी रुपये केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडून मंजूर केले आहेत. त्यापैकी १६ कोटी रुपये भुयारी मार्गासाठी आणि उर्वरित रक्कम भुयारी मार्गाच्या दुतर्फा ४५ मीटर जोडरस्त्यांसाठी असून हे काम कोकणरेल्वे महामंडळ करणार आहे.भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनासाठी जठार यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, दिगंबर मांजरेकर, कोकण रेल्वेचे उपप्रबंधक राजू पडगार कार्यकारी अभियंता पी.एन. माळीण, सहायक अभियंता के.एन. बिद्री, वरिष्ठ शाखा अभियंता बी.व्ही. मुरकुटे, शाखा अभियंता एस. बी. शिंदे, सरपंच अवधूत नारकर, अभिजित पवार आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)