वैभववाडी रेल्वे स्टेशन मास्तर संजय शिंगाडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन..!
वैभववाडी तालुक्यात पसरली शोककळा..!
वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर संजय बाबाजी शिंगाडे वय 47 यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने वैभववाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे. संजय शिंगाडे रा. नापणे हे आज सकाळी कोकिसरे बांधवाडी येथील शिंगुदेवीच्या दर्शनासाठी मित्रांसोबत गेले होते. दर्शन घेऊन ते पायवाटेने चालत आले.
मोटरसायकलवर बसताना त्यांना अचानक चक्कर आली. हृदयविकाराच्या धक्क्याने ते जाग्यावर कोसळले. त्यांच्या समवेत असणा-या मित्रांनी त्यांना तात्काळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी वैभववाडीत समजतात ग्रामीण रुग्णालयात राजकीय पदाधिकारी व रेल्वे संघटनांचे पदाधिकारी यांनी मोठी गर्दी केली. तसेच नापणे गावातील ग्रामस्थांनी ही रुग्णालयात धाव घेतली. वैभववाडी पोलीस यांनीही रुग्णालयात येत पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
गेली बावीस वर्षे संजय शिंगाडे हे कोकण रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. पाच वर्षापासून ते वैभववाडी येथील स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. रेल्वे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी ते घेत होते. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांची धडपड होती. तालुक्यात त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. तसेच रेल्वे संघटनेमध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)