अज्ञात चोरट्यांनी तीन मंदिरातील फंडपेट्यावर मारला डल्ला..!
निमअरुळे, सडूरे व कुर्लीतील मंदिरात चोरी ; वैभववाडी तालुक्यात खळबळ.
वैभववाडी | नवलराज काळे :
अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील तीन मंदिरातील फंडपेट्या फोडत रोख रक्कम लंपास केली आहे. फंडपेट्यांची तोडफोड करत त्यातील १० हजार ५०० इतकी रक्कम चोरीस गेली आहे. निमअरुळे येथील बोर्चादेवी मंदिर, सडूरे येथील रवळनाथ मंदिर व कुर्ली येथील कुर्लादेवी मंदिर या मंदिरात चोरी झाली आहे. वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चोरीचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री निमअरुळे येथील बोर्चादेवी मंदिरातील फंडपेटी फोडली. मंगळवारी सकाळी दशरथ गुरव हे शेतात जात असताना त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले.
ते मंदिरात गेले असता त्यांना पेटी नसल्याचे निदर्शनाला आले. त्यांनी शेजारी राहणारे गणपत रावराणे, पोलीस पाटील अंकुश अंगवलकर यांना याबाबतची माहिती दिली. यांनी ग्रामस्थांसहित सर्वत्र शोधाशोध केली. दरम्यान फंडपेटी मंदिरापासून ६० मीटर अंतरावर काजूच्या बागेत आढळून आली. ती फंडपेटी फोडण्यात आली होती. त्याचे लॉक तोडले होते. पेटीतील १५०० रुपये चोरट्याने लंपास केले. तर सडूरे येथील रवळनाथ मंदिरात ही पत्र्याची फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. व काही अंतरावर फेकून दिली. यातील ८००० इतकी रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. याबाबतची माहिती दत्ताराम मोहन रावराणे यांनी पोलिसांना दिली. त्याचबरोबर कुर्ली येथील कुर्लादेवी मंदिरात चोरट्यांनी फंडपेटीवर डल्ला मारला. पेटीतील १००० रक्कम चोरली. तर पेटी मंदिरापासून काही अंतरावर फेकून दिली. मोहन पवार यांच्याकडून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस नाईक मारुती साखरे, अभिजीत तावडे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला आहे. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे करत आहेत. तालुक्यात मंदिरातील चोरीच्या घटना वाढत आहेत. मंदिर ट्रस्ट व संस्थांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मंदिरातील फंडपेट्यात जमा झालेली रक्कम प्रत्येक महिन्याला काढून ती सुरक्षित करावी, असे आवाहन अमित यादव यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)