“बॅ. नाथ पै – लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” या पुस्तकाचे प्रकाशन..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
संजय रेंदाळकर लिखित “बॅ. नाथ पै – लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” या पुस्तकाचे प्रकाशन साने गुरुजी पुण्यतिथीचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे रामचंद्र आंगणे, सुरेश ठाकूर, श्री. किशोर शिरोडकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर बँ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री.दीपक भोगटे, कट्टा सेवांगणचे श्री.शिरोडकर , श्रीम.शृंगारे मॅडम, श्री.शिवराज सावंत, श्री. अरविंद शंकरदास, श्री. बापू तळवडेकर, श्री. गुरुनाथ ताम्हणकर उपस्थित होते.
इचलकरंजी येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते संजय रेंदाळकर यांच्या संकल्पनेतून सुनील कोकणी आणि संकेत जाधव यांनी खास मुलांसाठी बॅ. नाथ पै यांचे विचार आणि जीवनप्रवास उलगडणारे पुस्तक संकलित केले आहे.
बॅ. नाथ पै यांना ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हटलं जातं. विरोधकांनाही मंत्रमुग्ध करणारे अलौकिक वक्तृत्व नाथांनी अंगभूत गुणांना प्रयत्नांची जोड देऊन कमावले होते. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या भाषणातील प्रमुख विचार या पुस्तकात संग्रहीत केलेले आहेत. नाथांचे देशभक्ती विषयक विचार, स्वातंत्र्य आणि लोकशाही बाबतची मते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कोकणावरील निस्सीम प्रेम, सीमाप्रश्नाबाबतची धडपड, विद्यार्थी व नागरीक यांना केलेले मार्गदर्शन, कलावंतांची केलेली कदर याविषयी त्यांचे विचार या पुस्तकात वाचायला मिळतात.
“असिधारा व्रताने सेवादलाचे कार्य करूया” हा नाथांचा संदेशही या पुस्तकात अधोरेखित केला आहे. यांच्याविषयीचे भाई वैद्य, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, जयानंद मठकर, बबन डिसोजा, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक विभूतींचे कौतुकोद्गार येथे संग्रहित केलेले आहेत.
बॅ. नाथ पै यांचा जीवनप्रवासातील महत्त्वाच्या घटना तारीखवार देण्यात आल्या आहेत. नाथांच्या जीवनातील दुर्मिळ क्षणचित्रांचाही या पुस्तकात संग्रह करण्यात आला आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर कवीबर्य मंगेश पाडगावकर यांची “ज्यांची ह्रदये झाडांची” ही कविता वाचायला मिळते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले. आभार सौ. वैष्णवी लाड यांनी मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)