कवी सिद्धार्थ तांबे महाकवी अश्वघोष पुरस्काराने सन्मानित..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
कणकवली तालुक्यातील शिवडाव गावचे सुपुत्र व आरोंदा हायस्कूल कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांना महाकवी अश्वघोष पुरस्काराने दादर मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण दादर येथील साहित्य अकादमीच्या सभागृहात डाॅ. अशोक इंगळे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, शाल व पाच हजार रोख असे आहे. या वितरण समयी प्रख्यात समीक्षक मोतीराम कटारे व डाॅ. भास्कर पाटील, संस्थाध्यक्ष प्रवीण रुपवते, सचीव प्रशांत रुपवते उपस्थित होते.
सूर्यकुलातील लोकांनी सूर्योन्मुख दिशेने वाटचाल केली तरच मुलत: वैश्विक असलेली आंबेडकरी कविता अधिक व्यापकपणे जागतिक स्तरावर आपले अस्तित्व निर्माण करू शकते. सनातन व्यवस्थेला छेद देत निर्माण होणारी आंबेडकरी कविता ग्लोबल आहे. या कवितेने समिष्ठीची, सर्वहारा समाजाची भाषा अवगत केली आहे. आंबेडकरी कवी हा वंचित, उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी, नवसमाज निर्मितीसाठी दिशादिग्दर्शन करण्याचं मौलिक कार्य करीत असतो. कवी सिद्धार्थ तांबे यांची कविताही याला अपवाद नसून ती कालातीत असून ती बुद्ध, फुले-आंबेडकरी विचारधारेची कास धरते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. अशोक इंगळे यांनी यावेळी केले.
जी व्ही रुपवते मेमोरियल ट्रस्ट ही सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून या ट्रस्टतर्फे गत सहा वर्षांपासून, मराठी वाङमय क्षेत्रातील उत्कृष्ट काव्यसंग्रहाची निवड करून त्या काव्यसंग्रह व कवीचा सन्मान करीत आहे. वर्ष २०२१ या वर्षी हेतकर्स पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या, कवी सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाची निवड करून त्याचा सन्मान करण्यात आला. या यावेळी समीक्षक डाॅ. भास्कर पाटील यांनी कवी सिद्धार्थ तांबे यांच्या कवितासंग्रहाचा आढावा घेतला व कवीचे अभिनंदन केले. सिद्धार्थ तांबे हे विविध सामाजिक संस्थेत कार्यशील असून सम्यक साहित्य संसद या वाङमयीन संस्थेचे प्रमुख कार्यवाह आहेत. ‘ प्रसंवाद ‘ या अनियतकालिकाच्या संपादनात त्यांचा सहभाग असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी साहित्य चळवळ गतिमान करण्यात मोठा वाटा आहे. ‘दर्पण प्रबोधिनी ‘ या संस्थेतही ते कार्यशील आहेत. त्यांच्या लिखित कवितांचा साहित्यिक वर्तुळात बोलबाला असून ‘ सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने ‘ हा काव्यसंग्रह ‘ हेतकर्स पब्लिकेशनचे सुनिल हेतकर यांनी प्रकाशित केला आहे. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने अध्यक्ष आनंद तांबे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल हेतकर यांनी तर आभार प्रवीण रुपवते यांनी मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)