प्रशालेचे आधारस्तंभ कै. उल्हास तुकाराम कांदळगांवकर यांच्या पश्चातही त्यांच्या कुटुंबियांची दातृत्वाची शृंखला…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित,ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण ह्या माध्यमिक शाळेच्या विकासासाठी ज्यांनी आवश्यक त्यावेळी साहाय्य केले, ते कांदळगाव येथील मुंबईस्थित प्रसिद्ध उद्योगपती, शाळेचे आधारस्तंभ कै. उल्हास तुकाराम कांदळगावकर यांच्या सहचारिणी श्रीमती शैला उल्हास कांदळगावकर व त्यांची कन्या जान्हवी उल्हास कांदळगावकर यांनी शाळेला ५० नवीन बेंच डेस्कच्या स्वरूपात बहुमोल देणगी देऊन कै.उल्हास कांदळगावकर यांचा वारसा अखंडपणे चालू ठेवला आहे. आजपर्यंत ज्या शैक्षणिक साहित्याची शाळेला अत्यंत आवश्यकता असते, त्याची शाळेच्या विनंतीनुसार दातृत्वाची परंपरा लाभलेल्या कांदळगावकर कुटुंबीयांकडून पूर्तता करण्यात आली आहे. ओझर विद्यामंदिरच्या जडण- घडणीमध्ये त्यांचे बहुमोल योगदान आहे. कांदळगावकर कुटुंबियांप्रमाणेच शाळेच्या अनेक हितचिंतकांच्या व माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये अखंडित व दर्जेदार शिक्षणाबरोबरच नाविन्यपूर्ण कौशल्याधिष्ठीत उपक्रम व प्रकल्प राबविणे शक्य होत आहे. श्रीमती शैला व जान्हवी उल्हास कांदळगावकर यांनी शाळेला नवीन बेंच डेस्क पुरविल्याबदल शाळा व संस्थेने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.