ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्राची तीन हजार किमीपेक्षा जास्त सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा अशा सहा राज्यांसह दादरा, नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते पोलीस महासंचालक स्तरावर आंतरराज्यीय समन्वय, गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण बाबत आंतरराज्य समन्वय बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आंतरराज्यीय तपासणी नाक्यांवर मनुष्यबळ तैनात करून अवैध रोख रक्कम, दारू, अवैध अग्निशस्त्रे, अंमली पदार्थ, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, बोगस मतदार यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
व्हीआयपी बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामासाठी सर्व घटकांद्वारे ड्रोनचा व्यापक वापर केला जात असून विधानसभा निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र पोलीस सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.