मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मालवण तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. लोकशाहीच्या या उत्सवात मालवण तालुक्यातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत पुरुष, महिला तसेच युवा मतदारांनी मतदान केंद्रावर उपस्थिती दर्शवून मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत सरासरी ९ ते ११ टक्के एव्हढे मतदान झाले महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती पैकी एक असलेल्या मालवण कुडाळ मतदार संघात महायुतीचे निलेश राणे व महाविकास आघाडीचे आम वैभव नाईक यांच्यात जोरदार लढत होत असून मतदारांकडून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी सायंकाळी मतदारांची मोठी गर्दी उसळल्याने हा अनुभव गाठीशी असल्याने यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काही सुज्ञ मतदारांनी सकाळपासूनच मतदानाला हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. मतदान प्रक्रियेसाठी मालवण शहरासह तालुक्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देऊळवाडा, कुंभारमाठ, चौके, कट्टा, आदी ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मालवण शहरातील देवूळवाडा मतदान केंद्र, टोपीवाला हायस्कुल व भंडारी हायस्कुल येथील मतदान केंद्रावरही मतदारांनी बऱ्यापैकी उपस्थिती दर्शवीत मतदान केले. तालुक्यातील ग्रामीण भागातील इतर मतदान केंद्रावर काहीशा संथ गतीने मतदान सुरु आहे.मालवण कुडाळ मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध महायुतीचे उमेदवार व माजी खासदार निलेश राणे यांच्यात खरी लढत होत असून या दोघांसह पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होत असतानाच उमेदवार वैभव नाईक व उमेदवार निलेश राणे या दोघांनीही सकाळच्या सत्रात मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला.