मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे सवाल..!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेतील दोन विरोधी गट व त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु असताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आणखी एका प्रसिद्धी पत्राद्वारे विरोधकांना खरीखोटी सुनावली आहे.
प्रसारमाध्यमांना जारी केलेल्या पत्रानुसार माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी विरोधकांनी भुयारी गटारबाबत आमदारांना दिलेल्या सल्ल्याबाबत समाचार घेत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या तांत्रिक व विरोधकांच्या सारासार अभ्यासाबाबत शंका व्यक्त केली आहे.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या प्रसिद्धी पत्रानुसार ,” काही दिवसांपूर्वी आमच्या आमदार नाईक साहेबांच्या कार्यशैलीवर जाहीर सभेतून स्तुतीसुमने उधळणाऱ्या आचरेकर यांना भुयारी गटाराच्या कामाबाबत अचानक आमदार यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करावी लागली याचे कारण भुयारी गटार नसून 15 दिवसांपूर्वी आमदारांनी आचरेकर यांच्या प्रभागात बैठकीच्या वेळी तिकडच्या लोकांनी मागणी केल्याप्रमाणे रस्त्यासाठी 30 लाख रुपये निधी आठ दिवसाचे आत मंजूर केले हेच आहे.
आमदारांनी ‘ठेकेदारांच्या कामात सुधारणा झाली नाही तर कारवाई करणार’, असे म्हणल्यावर आचरेकर यांनी आमदारांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला . मग 2012/13 साली आचरेकर यांच्या कालावधीत याच ठेकेदाराचे टेंडर रद्द करण्या बाबत ठराव करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे का पाठविण्यात आला होता? त्यावेळी आचरेकर यांचा अभ्यास कच्चा होता की आणखी काही कारण होत हे पण बघणे आवश्यक आहे.
आचरेकर यांच्या कालावधीत 2009 साली राणेसाहेबांनी मंजूर करून दिलेली भुयारी गटार योजना चुकीच्या नियोजनामुळे दहा वर्षात पूर्ण करण्यात आली नव्हती. ही योजना बंद होती आणि निधी अभावी कर्ज काढण्याची नामुष्कीही नगर पालिकेवर आलेली होती. आम्ही 2016 सत्तेत आल्यावर ही बंद असलेली योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. शासनाने कर्ज काढून ही योजना पूर्ण करण्याबाबत सूचित केले होते. पण याबाबत आमचे कृतीशील आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी खासदार विनायक राऊत व तत्कालीन पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या मार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करून सुमारे 9 कोटी रुपये अनुदान प्राप्त करून दिले आणि त्यामुळे नप वरची कर्जाची नामुष्की टाळली गेली आणि या कामाला सुरुवात झाली.
मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीचा सर्वच विकास कामांना त्याचा फटका बसला. भुयारी गटार बाबत सुद्धा विलंब झाला ही वास्तुतिथी आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न पण सुरू आहेत. पण येणाऱ्या निवडणुका विचारात घेऊन ज्या कामासाठी आमदार साहेब आग्रही आहेत , त्या कामाबाबत निवेदन केलेल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून त्याचे राजकीय भांडवल करण्याचा आणि आपल्या चुका झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप मार्फत केला जात आहे.
या बाबतीत भाजप पक्षात एकमतही दिसत नाही आहे. आदल्या दिवशी भाजप मधून निवडून आलेले उपाध्यक्ष राजन वराडकर आणि गणेश कुशे हे भुयारी गटार ठेकेदाराला काळ्या यादीत घालण्या बाबत प्रेस घेऊन आमदार नाईक साहेबांची भूमिका योग्य असल्याचे सांगतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी भाजप कार्यालयात सुदेश आचरेकर हे ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे योग्य नसून आमदार नाईक साहेबांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करतात ……आणि या दोन्ही प्रेस ला गणेश कुशे आवर्जून उपस्थित राहतात हे विशेष…!
त्यामुळेच भुयारी गटाराबाबत भाजपमध्येच एकवाक्यता नाही. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी मारण्याच काम सुरू आहे.
तब्बल 10 वर्षे आपली सत्ता असताना आणि आचरेकर सर्वेसर्वा असताना भुयारी गटार योजना सुरू होऊ शकली नाही. चुकीच्या पद्धतीने निधीचा वापर करण्यात आला.
सध्यातर पुढील निवडणुकीत ‘भाजपची सत्ता येणार आहे अशी वल्गना केली जात आहे’, त्यामुळे ज्यांच्या कारकिर्दीत ही योजना बंद पडली त्यांना लोक स्विकारणार की ज्यांनी ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला त्यांना स्वीकारणार याचा विचार भाजपने केला नसेल. पण सत्तेचं स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.
आचरेकर यांचे सत्तेचे हे स्वप्न जरुर स्वप्नच राहील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो “, असे महेश कांदळगांवकर यांनी नमूद केले आहे.