मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचा आरोप करत ते रस्ता काम ग्रामस्थांनी रोखून धरल्याची घटना शनिवारी घडली. ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला याबाबत कळविल्यानंतर शाखा अभियंता श्री दाणी यांनी बांदिवडे येथे येत सदर काम पुन्हा करून देण्यात येईल असे ग्रामस्थांना आश्वस्त केले.
बांदिवडे बाजार ते पालयेवाडी या मार्गावर रस्त्याचे डांबरीकरण चालू असून डांबरीकरण करताना योग्य दर्जाची व आकाराची खडी न वापरणे, काही ठिकाणी डांबरच वापरले नसल्याबाबत माजी पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल प्रभू, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मयेकर यांनी बांधकाम विभागाचे अभियंता श्री दाणी यांचे यावेळी लक्ष वेधले. उपस्थित ग्रामस्थांनीसुद्धा काम दर्जेदार नसल्याबाबत आपले म्हणणे मांडले. शाखा अभियंता दाणी यांनी सदर डांबरीकरण करण्यासाठी पसरलेली खडी काढून वर्क ऑर्डर प्रमाणे काम करून घेतले जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना यावेळी दिले. पुन्हा बोगस काम करण्याचा प्रयत्न झाल्यास होणाऱ्या परिणामाना शासन जबाबदार असेल असे यावेळी प्रमोद मयेकर यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच किरण पवार, भाजप नेते प्रफुल्ल प्रभू, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मयेकर आनंद परब, मधुकर परब, आशु मयेकर, आपा परब, विश्वनाथ परब, बाळा माळकर, बबलू मिठबावकर, लिलाधर मुणगेकर, बबन मांजरेकर, शाहू लखन बांदिवडेकर, गणेश बांदिवडेकर, निशु मुणगेकर, उमेश परब, संतोष मयेकर आदी बांदिवडे मळावाडी, पालयेवाडी खोरवाडी रहिवासी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.