मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आगामी नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून ओझर विद्यामंदिर प्रशालेने अनेक कौशल्याधिष्ठीत उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांसाठी आता कथ्थक नृत्य प्रशिक्षण सुरु केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच प्रयोगजीवी कला आत्मसात करण्याची संधी प्राप्त झाली आहे. पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमाबरोबरच ‘विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण’ ही संकल्पना ओझर विद्यामंदिरने प्रत्यक्ष अमलात आणली आहे. कथ्थक नृत्य प्रशिक्षण देण्यासाठी कांदळगाव येथील कथ्थक नृत्य विशारद सौ. शमिका पटवर्धन यांचं सहकार्य लाभलं आहे. शमिका पटवर्धन ह्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कथ्थक नृत्याचे वर्ग चालवतात. आपल्या गावातील शाळेलाही आपलं योगदान मिळाले पाहिजे, या भावनेतून संस्थेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी प्रशालेमध्ये कथ्थक नृत्य शिकवायला सुरुवात केली. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षाही देता येणार आहेत. कथ्थक नृत्य प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता आणि शारीरिक लवचिकता अधिक विकसित होणार आहे. त्याचबरोबर भविष्यात करिअरच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. ओझर विद्यामंदिर कांदळगांव प्रशाला जिल्ह्यातील एक ‘आदर्श मॉडेल’ बनवण्यासाठी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती आणि प्रशालेसाठी झटणारे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमाचे पाऊल उचललेलं आहे. शाळा हे कुटुंब मानून मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी शाळेच्या विकासाचा जणू ध्यासच घेतला आहे. शाळेच्या हिरकमहोत्सवानिमित्त प्रशालेने नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत.यापुढे प्रशालेतील विद्यार्थ्यांना अनेक प्रयोगजीवी कलाकौशल्यांचे शिक्षण देणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले . त्यामुळे पंचक्रोशीतील पालकांनी पाल्यांना शाळेत कौशल्याधिष्ठीत मिळणाऱ्या शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -