हळवलवासीय बि.के.तांबे प्रेमी करणार तीन शाळांमार्फत ‘स्टुडंट ऑफ द इयर ‘ चा गौरव…!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ| विशेष): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली जवळच्या हळवल गावचे सुपुत्र तथा जेष्ठ दशावतारी कलाकार कै. बि.के.तांबे यांच्या इच्छेनुसार हळवल गावातील ग्रामस्थांनी स्वप्नपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी बी. के. तांबे प्रेमींनी सढळ हस्ते मदत केली होती. यातील शिल्लक रक्कम गावातील शाळांना सुपूर्त करत हळवल ग्रामस्थांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
ज्या ठिकाणी मी पहिला रंग लावून माझ्या दशावतारी कलेची सुरवात केली त्याच ठिकाणी मला रंग लावून दशावतारी रंगमचावरून निवृत्ती घ्यायची आहे. व मला साथ दिलेल्या सर्व कलाकारांचा मला सन्मान करायचा आहे. अशी आपली अखेरची इच्छा व्यक्त करून जेष्ठ दशावतारी कलाकार बि. के. तांबे यांनी जगाच्या रंगमंचावरून निवृत्ती घेतली होती. आपल्या राजाची अखेरची इच्छा पूर्ण करत हळवल ग्रामस्थांनी स्वप्न पूर्ती नामक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बि. के. तांबे प्रेमींनी सढळ हस्ते मदत केली होती. त्यातील काही रक्कम शिल्लक राहिली होती. त्यातील सुमारे २२ हजार रक्कम हळवल गावातील शाळांना सुपूर्त करण्यात आली आहे. शाळा हळवल नं १ ला १० हजार रुपये, शाळा नं २ ला ६ हजार रुपये व शाळा नं ३ ला ६ हजार रुपये सुपूर्त करण्यात आले आहेत. ही रक्कम शाळेने फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून यातुन मिळणारे वार्षिक व्याज शाळेतील अष्टपैलू विद्यार्थ्याला तथा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ ला पारितोषिक म्हणून देण्यात यावेत अशी इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार हळवल गावातील शिक्षण ,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. यामुळे हळवल गावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या बी. के. तांबे यांच्या आठवणी कायम स्वरूपी स्मरणात राहतील व त्यांचे योगदान पुढील अनेक पिढ्या लक्षात राहील. असे हळवल ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी श्री,दया राणे,माजी सभापती श्री मधुकर सावंत,माजी सरपंच श्री शशिकांत राणे,माजी सरपंच स्मिता परब, माजी उपसरपंच प्रदिप गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री, सुदर्शन राणे, बी. के. तांबे यांचे चिरंजीव,श्री, कमलाकर (भाऊ)तांबे, तसेच तिन्ही प्रशालेच्या मुख्याध्यापक शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी आदी उपस्थित होते.