साळशी-झरीचीवाडी येथील लोकप्रिय पख़वाज वादक अमित नाईक यांचे निधन…!
शिरगांव |संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी-झरीचीवाडी येथील रहिवासी तथा लोकप्रिय असे प्रसिद्ध पख़वाज वादक अमित सदानंद नाईक (३७) यांचे सोम.दि.७ फेब्रु. रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचारादरम्याने दु.३,३० वा. निधन झाले.
अमित नाईक यांना लहानपणापासून भजनाची खूप आवड होती.त्यांच्या घराण्यात भजनकलेचा वारसा आहे.त्याचे दोन्ही बंधू अनंत आणि अजय हे देखील भजनी कलाकार आहेत.अमित यांना यापूर्वी उत्कृष्ट पख़वाज वादक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.प्रसिद्ध मृदुंगमणी दादा परब यांच्याकडे त्यांनी शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यांचे ते शिष्य होते. शिरगांव येथे त्यांनी ओम कृषी सेवा केंद्र या नावाने पशुखाद्याचे दुकान सुरू केले होते.
त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,मुलगा,विवाहित बहीण, ३ चुलते,चुलत भाऊ,भावोजी,पुतणे असा परिवार आहे. अमित यांना समाजसेवेची खूप आवड होती.अतिशय प्रामाणिक, हसमुख आणि परोपकारीवृत्ती असल्यामुळे त्याचा मित्रपरिवार खूप मोठा होता.सतत काहिनाकाही नवीन शिकण्याची त्याची धडपड असायची.त्यांचे निधनाचे वृत्त समजताच दुपारनंतर शिरगांव येथील व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवली.त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.