मालवण | प्रतिनिधी :केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर प्रथमच कोकण दौऱ्यावर येत असलेल्या ना. नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी आगमन होणार असून ना.राणे यांचे २६ ऑगस्ट रोजी मालवणात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. २६ ऑगस्टला मालवण तालुक्यात आचरा, मालवण शहर, चौके व कट्टा अशा चार ठिकाणी ना. नारायण राणे यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताच्या नियोजनाची बैठक मालवण भाजपा कार्यालयात पार पडली. त्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी ना. राणेंच्या स्वागताबाबत माहिती दिली. यावेळी सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, सभापती अजिंक्य पाताडे, विक्रांत नाईक, नगरसेवक जगदीश गावकर, आप्पा लुडबे, प्रमोद करलकर, आबा हडकर, यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण दौऱ्याची सुरुवात २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आचरा येथून होईल. आचरा तिठा येथे आचरा, हिवाळे, मसुरे जि प मतदारसंघातील कार्यकर्ते ना. नारायण राणें यांचे स्वागत करतील. त्याठिकाणी जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण यांच्यावर स्वागत नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता मालवण शहरात भरड येथे ना. राणेंचे स्वागत होईल. याची जबाबदारी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर आणि पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
मालवण शहरात स्वागत झाल्यानंतर चौके येथे ना. नारायण राणेंचे स्वागत होईल. त्याठिकाणी सरपंच राजा गावडे, युवक अध्यक्ष विक्रांत नाईक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर कट्टा येथे स्वागत करण्यात येणार असून त्याची जि प सदस्य संतोष साटविलकर, सभापती अजिंक्य पाताडे, राजन माणगावकर, दादा नाईक यासह इतर पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. यासह विविध सामाजिक संघटना देखील ना. नारायण राणे यांचे स्वागत करणार आहेत, असेही धोंडी चिंदरकर म्हणाले.