मसुरे गावातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे खेरवंदवाडीचे सुपुत्र श्री. सतीश कुमार चंद्रकांत राऊत यांची मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक या पदावर ती नुकतीच निवड झाली आहे. याबद्दल सर्व स्तरांमधून सतीश राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या निवडीबद्दल मसुरे गावामध्ये जल्लोष व्यक्त करण्यात आला. सतीश राऊत हे सध्या मुंबई गोरेगाव वनराई पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत..
मालवण तालुक्यातील मसुरे सारख्या खेड्यातून सतीश राऊत यांनी मेहनत जिद्द प्रामाणिकपणा सचोटी आणि अथक परिश्रमातून कोणताही वरदहस्त नसतानासुद्धा पोलीस निरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे हे समस्त मसुरे गावासाठी भूषण आहे. मुंबई पोलिस दलामध्ये गेली 26 वर्ष सेवा देताना सतीश राऊत यांनी विविध गुन्ह्यांचा छडा योग्य पद्धतीने लावलेला आहे. यापूर्वी आपल्या सेवाकार्य काळामध्ये पोलीस दलातील अनेक गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. मसुरे येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी मालवण येथील स.का. पाटील कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. पुढे पोलिस दलामध्ये भरती झाल्यानंतर मुंबई येथे विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली होती. सतीश कुमार राऊत यांनी कॉलेज जीवनात ही विविध खेळांमध्ये राज्यस्तरापर्यंत चमकदार कामगिरी केली होती. यावेळी बोलताना सतीश कुमार राऊत म्हणाले की त्यांच्याकडून यापुढेही पोलीस दलामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून पोलीस प्रशासनाला अभिमान वाटेल असेच काम यापुढेही केले जाईल.मसुरे गावामधून सर्व स्तरांतून सतीश राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.